विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 8 मार्च: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करता येते. नाशिक जिल्ह्यातील केरसाणे या लहानशा गावातील पूनम भिला अहिरे हिने हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. त्यात पूनम हिने यंदा राज्यात ओबीसी गटातून मुलींमध्ये तिसरा क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. पूनमच्या या दुहेरी यशाबद्दल केरसाणे गावासह संपूर्ण बागलाण तालुक्यात तिचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आई-वडील शिक्षक बागलाण तालुक्यातील केरसाणे हे पश्चिम पट्यातील अडीच हजार लोकवस्तीचे लहानसे गाव आहे. भुईमूग शेंगा उत्पादनात हे गाव अग्रेसर आहे. पूनम भिला अहिरे हिचे मुळ गाव केरसाणे आहे. आई वडील दोघेही बलायदुरी ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यामुळे घरात पूर्वीपासूनच शैक्षणिक वातावरण होते. आई बाबांच्या मार्गदर्शनात सुरवातीपासून अभ्यासाची आवड निर्माण झाली. त्यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले, असे पूनमने सांगितले.
यापूर्वीही मिळाले यश पूनमने यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परीक्षेत अधिकारी वर्ग 2 परिक्षेत यश मिळवले. मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून ती सेवेत रुजू झाली होती. मात्र, तिला याहून उच्च पद मिळवण्याचा ध्यास होता. अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने पुन्हा परीक्षा दिली. त्यामुळे तिला हे यश संपादन करता आले. पूनम सध्या नागपुरातील वनमती येथे प्रशिक्षण घेत आहे. MPSC Success Story: वडील शेतकरी, जालन्याचा शशिकांत क्लास वन अधिकारी!, पाहा Video पूर्वीपेक्षा उत्तुंग यश राज्यसेवेतील सर्वोच्च पद समजले जाणारे उपजिल्हाधकारी पद मिळते आहे, ही अतिशय आनंददायी बाब आहे. हे पद मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने मनस्वी आनंद होत असून घरी, गावात, तसेच समाज माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकंदरीत हे यश पूर्वी पेक्षा उत्तुंग असल्याने अधिक समाधानी आहे, असे पूनमने सांगितले. MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वन अधिकारी! Video स्वत:ला अभ्यासात झोकून द्या प्रत्येकाने आपल्यातील क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेची निवड करावी. कारण स्पर्धा परीक्षांची मांडणी बघता शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता असते. संयम आणि जिद्द असेल तर एक दिवस यश नक्की मिळते. मात्र या वाटेत स्वतःला झोकून देत प्रामाणिक प्रयत्न करत रहा, असा सल्ला पूनम अहिरे यांनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.