जळगाव, 6 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपूर्वी खूनाच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता पुन्हा जळगावातुन संतापजनक घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - याप्रकरणी विनोद सुकलाल भोळे (रा. सदोबा नगर, जळगाव) या नराधमाविरोधात आज मंगळवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही संतापजनक घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान घडली. पीडित तरुणी एका महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. आरोपी विनोद भोळे याच्याशी पीडितेच्या कुटुंबाचे घरोब्याचे संबंध होते. त्यामुळे तो याठिकाणी नेहमी यायचा. याच कालवाधीतल त्याची पत्नी व दोन मुले गावाला गेलेले होते. त्यामुळे पीडितेकडून त्याला जेवणाचा डबा मिळत होता. तर पीडित तरुणीच्या आईचे पंधरा दिवसांपूर्वीच आजारपणामुळे निधन झाले. तर तिचे वडील एका ठिकाणी कामाला आहेत. तिच्या वडिलांची 1 सप्टेंबरला रात्रपाळीची ड्युटी होती. त्यामुळे ते कामावर गेले होते. यादरम्यान, पीडिता एकटीच घरी होती. यावेळी रात्री 11 वाजेच्या सुमारास आरोपी भोळे हा पीडितेच्या घरी गेला. त्याने यावेळी दरवाजा उघडायला लावला. तसेच घरात आल्यावर चाकूचा धाक दाखवून बाहेर निर्जनस्थळी घेऊन गेला. यावेळी तिथे अंधार असल्याने तेथून तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. हेही वाचा - गुंगीची गोळी देऊन झोपवले जायचे, नवी मुंबईतील चर्चमध्ये तीन मुलींवर लैंगिक अत्याचार त्याने यावेळी घरात या तरुणीवर दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर एक तासाने तिची सुटका केली. पीडितेला त्याने डाव्या हातावर चाकू मारला होता. त्यामुळे तिला दुखापतही झाली. यानंतर पीडितेने एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.