नाशिक, 12 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तसंच सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्मही आला होता, पण सुधीर तांबे यांनी फॉर्मच भरला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. वेळेमध्ये एबी फॉर्म आला नाही, म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले. अपक्ष उमेदवार असलो तरी मी काँग्रेसचाच आहे, असंही सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं. अपक्ष उमेदवार असलो तरी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पाठिंबा मागणार असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे. विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, पण शेवटच्या क्षणापर्यंत तांबे पिता-पुत्रांपैकी कोण अर्ज भरणार याचा सस्पेन्स कायम होता. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे हे दोघंही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, पण नेमका उमदेवार कोण? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
दुसरीकडे भाजपकडूनही शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होत नव्हता, त्यामुळे सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. सत्यजीत तांबे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला, पण त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.