नाशिक, 2 जुलै : नाशिक शहरातील वस्तीमध्ये पुन्हा एकदा बिबट्या (Leopard seen in Nashik) आढळला आहे. शहरामधील सातपूर अशोक नगर परिसरातील इमारतीमध्ये हा बिबट्या शिरला आहे. या भागातील घराच्या बाल्कनीमध्ये हा बिबट्या दबा धरून बसल्यानं नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण आहे. या भागात बिबट्या दाखल झाल्याची माहिती समजताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. नाशिक शहराच्या जवळच्या भागातील शेती असलेल्या परिसरात बिबट्याचा वावर यापूर्वी देखील होता. पण, आता शहराच्या गर्दीच्या ठिकाणी बिबट्या फिरण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील सिटी सेंटर मॉलमध्ये बिबट्या दिसला होता. त्याचबरोबर सातापूर परिसरातही बिबट्याचं दर्शन झालं होतं. त्यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा बिबट्या आढळल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. #Nashik #NashikLeopard #Leopard pic.twitter.com/2d7Pe0MdXs
— News18Lokmat (@News18lokmat) July 2, 2022
एखाद्या परिसरात बिबट्या दाखल झाल्यावर त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्या गर्दीमुळे बिबट्या बिथरण्याचा धोका असतो. त्यामधून काही दुर्दैवी प्रकार देखील घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता, बिबट्या दिसल्यास तातडीनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.