नाशिक, 16 जानेवारी : काँग्रेस आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडीची मोठी अडचण आहे. सत्यजीत तांबे यांनी मी पाठिंबा मागण्यासाठी भाजपकडेही जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या बंडाला भाजपची फूस असल्याचेही बोलले जात आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "सत्यजित तांबे सहज निवडून येतील पण भाजपचा पाठिंबा घेतला तर.." असं वक्तव्य महाजन यांनी केल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
सत्यजित तांबे गोल्ड मेडल घेतील, पास होतील पण भाजपने पाठींबा दिला तर. भाजप ज्याला पाठिंबा देईल तो डिस्टिंक्शनमध्ये पास होईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवार शुभांगी पाटील यांच्याविषयी विचारले असता महाजन म्हणाले, की जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांचे माघारी आम्ही केल्या आहेत. बाकी सगळ्यांच्या माघारी घेत शोधत फिरण्याची गरज नाही. भरपूर लोक उभे राहतात त्यांना मतं किती पडतात त्याबद्दल बोलायचं नाही. राजकीय दृष्ट्या आम्हाला फायद्या तोट्याची लोक आहे. कोणाला उभे ठेवायचे कोणाला मागे घ्यायचं ते व्यवस्थित झालेले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? आमचा पाठिंबा कोणाला हे काही सांगता येत नाही. उद्या काय होईल? देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. त्रिशंकू सारखी परिस्थिती आहे. कोण कोणाकडे जाईल, कोण कोणाला पाठिंबा देईल? जोपर्यंत हे निश्चित होत नाही, तोपर्यंत कोण किती प्रभावी ठरेल हे सांगणं कठीण असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
वाचा - MLC Election : नाशिकमध्ये तांबे चकाकणार? पदवीधर मतदारसंघाच्या सदस्य नोंदणीचा ग्राऊंड रिपोर्ट!
देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
सत्यजित तांबे यांच्या पुस्त्तक प्रकाशनच्या वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले होते. त्या अनुषंगाने विचार केला तर भाजपनेही विचार करू अशी भूमिका घेतल्याने आघाडीच्याही भुवया उंचविल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. सुधीर तांबे यांच्या आणि सत्यजित यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील काँगेस अडचणीत आली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात गप्प का? कुठे आहेत बाळासाहेब थोरात? या बंडामागे थोरात यांचा छुपा पाठींबा आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girish mahajan, Nashik, Satyajit tambe