नाशिक, 18 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्याने महाविकास आघाडीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त करत पाठींबा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यावर अद्याप तांबे पितापुत्रांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक येथे आज शिक्षक भारती, जनता दल युनायटेड कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्यावेळी आमदार कपिल पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे देखील उपस्थित होते.
सुधीर तांबे यांना आधीच सांगितलं होतं..पण : कपिल पाटील
आमदार डॉ. सुधीर तांबे नेहमीच पेन्शन, अपंग, पीडित यांच्या प्रश्नी आपल्यासोबत असतात. मागील 3 वर्षांपासून मी डॉ. तांबे यांना सांगत होतो, सत्यजितला आताच पुढे आणा. सत्यजितचा अभ्यास, त्याच्या कामाची पद्धत चांगली आहे. योग्य वेळेला योग्य तरुण चेहऱ्याला स्थान दिलं, यासाठी डॉ. तांबे तुम्हाला सलाम करतो, असं आमदार कपिल पाटील आपल्या भाषणात म्हणाले. आमदार सुधीर तांबे यांनी योग्य निर्णय घेतला. मात्र, त्यांची चुकीची प्रतिमा रंगवली गेली. सत्यजितवर अन्याय झाला. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, सत्य की जीत होती है, असे सांगत नाशिक पदवीधर मतदार संघात आपले उमेदवार सत्यजित तांबे यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
वाचा - महाविकासआघाडीत धुसफूस सुरूच, काँग्रेस-शिवसेनेत वाद, अजितदादांचा काढता पाय!
शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात दोन गट
अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचं शुभांगी पाटील खोट बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला आहे.
सत्यजित तांबे यांनाच काँग्रेसने पाठिंबा द्यावा..
दुसरीकडे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनाच काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी मागणी नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी ही मागणी केली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा घोळ झाला आहे, त्यामुळे तांबे कुटुंबांच्या पाठीशी काँग्रेसने राहावे, अशी मागणी त्यांनी केलीय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आम्ही सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी मागणी करणार असल्याचेही दिवे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणूक माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. सत्यजित तांबे प्रचारात व्यस्त असून ते आपल्या संगमनेर शहरातच आहेत. संगमनेरातील निवासस्थानातून बाहेर पडले तरी प्रसार माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिला आहे. कुठे जाणार, कुणाला भेटणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Satyajit tambe