नाशिक, 18 जानेवारी : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा हे तालुके वैविध्यपूर्णतेने नटलेले आहेत. निसर्गाचं वरदान या तालुक्यांना मिळालेले आहे. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तीन ही ऋतुंमध्ये या ठिकाणी प्रसन्नमय वातावरण असतं. मात्र, या निसर्गरम्य वातावरणाचा फार क्वचित लोक आहेत की त्यांनी फायदा करून घेतला आहे. त्यातील एक नाव म्हणजे सुरगाणा तालुक्यातील गारमाळचा रहिवासी हर्षद थविल आहे. त्याने आपल्या शेतात रानझोपडी नावाची एक अनोखी संकल्पना उभारली आहे.
हर्षद थविल हा उच्चशिक्षित आहे त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. मात्र, त्याला शहरापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडत. त्यामुळे त्याने शेतात रानझोपडी नावाची एक अनोखी संकल्पना उभारली आहे. हर्षदने केलेला हा प्रयोग चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतरही गावच्या मातीशी जोडलेली नाळ त्याची कायम आहे. कृषी पर्यटनापेक्षाही दुर्मिळ वृक्ष प्रजातींचे संरक्षण व संवर्धन हा या रानझोपडीचा मुख्य हेतू आहे. यातूनच रानझोपडीचा हा अनोखा प्रवास सुरू झाला आहे, असं हर्षद थविलने सांगितले.
विविध दुर्मिळ वनस्पतींच संवर्धन
लहानपणापासूनच शेती-मातीत रमणाऱ्या हर्षदला डोळ्यांदेखत नष्ट होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती, आदिवासी दुर्गम भागातील झाडे टिकविण्याची चिंता वाटत असायची, याच मानसिकतेतून त्याने या दुर्मिळ कलमांची लागवडही रानझोपडीच्या आसपास केली आहे. याशिवाय कॉफी, कोको, लिची, मंगोस्टोन, स्टार फ्रूट अशा विविध विदेशी वृक्षांच्या प्रजातींचीदेखील लागवड त्याने या परिसरात केली आहे.
उत्तम वारली चित्रकार
हर्षदला फक्त निसर्गाच्या सानिध्यात रहायलाच आवडत नाही तर त्याला वारली पेंटिंग मधून निसर्गाचं रूप साकारायला देखील आवडत. तो एक उत्तम वारली चित्रकार आहे. त्याने आपल्या रान झोपडी मधील भिंतींवर विविध प्रकारची वारली पेंटिंग साकारली आहे.
Video : चहा विक्रेत्याचा मुलगा बनला इंजिनिअर, फक्त 43 दिवसांमध्ये केला नाशिकमध्ये चमत्कार
रानझोपडीत मिळत अस्सल घरगुती जेवण
रानझोपडीत तुम्हाला निसर्गमय वातावरणाची तर अनुभूती मिळेलच. मात्र तुम्हाला अस्सल आदिवासी बांधवांच घरगुती जेवणाचा आस्वाद ही घेता येईल. या जेवणात कोणत्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले जेवण हर्षद स्वतः बनवून देतो. त्यामुळे रानझोपडतील वास्तव्याला आता अनेक जण पसंती देऊ लागले आहेत.
चहाचेही अनेक प्रकार
जंगली तुळस (काळी तुळस), कॉफी, बासमती चहा, अवाकाडो, सिडलेस लिंबू यांसह अनेक चहा उपलब्ध आहेत, असेही हर्षद थविलने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.