विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक 24 मार्च : आंब्याचा सिजन सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात रत्नागिरी मधील हापूस आंबा हा जगभर प्रसिद्ध आंबा आहे. त्याची चव सर्वांनाच भुरळ पाडत असते. नाशिकमध्ये रत्नागिरीचा हापूस, देवगडचा हापूस आणि रत्नागिरीचा केशर आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. कोकणातील बांधव दरवर्षी आंबा विक्रीसाठी नाशिकमध्ये येत असतात. याही वर्षी शहरात आंबे विक्रीसाठी आले आहेत. मात्र, दर चांगलेच तेजीत आहेत. 1200 रुपये डझनने आंब्याची विक्री होत आहे आणि त्याला नाशिककर ही चांगला प्रतिसाद देत आहेत.
बदलत्या हवामानाचा हापूसला फटका
यंदा वारंवार हवामान बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम हा आंबा उत्पादनावर देखील झाला आहे. कारण थंडी जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात मोहर आलाच नाही, पालवी फुटली नंतर जो मोहर आला त्याची ही फळधारणा चांगल्या प्रमाणात झाली नाही. त्यामुळे यंदा कोकणात देखील आंब्याच्या उत्पादनात दरवर्षीपेक्षा बरीच घट झाली आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे दर लवकर कमी होणार नाहीत. मात्र, तरीही आंबा शौकीन जे आहेत ते आंबे जास्त दर असतानाही खरेदी करत आहेत, अशी प्रतिक्रिया आंबा विक्रेत्या मुशरद कालसेकर यांनी दिली आहे.
ग्राहकांनी आम्हाला मदत करावी
रत्नागिरी मधील मुशरद कालसेकर यांनी कालिका माता मंदिर परिसरात रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा स्टॉल लावला आहे. मात्र, बरेच ग्राहक दर ऐकून आवाक होतात. त्यांना ते दर खूप वाटतात. मात्र, आंब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे दर वाढले आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याच उत्पादन होत होतं. मात्र, बदलत्या हवामानाचा फटका बसल्यामुळे यंदा उत्पादन फार कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी देखील आम्हाला समजून घ्यावं. पुढे देखील दर कमी होतील, असं दिसत नसल्याची प्रतिक्रियाही मुशरद कालसेकर यांनी दिली आहे.
कुठे मिळतील हापूस आंबे?
नाशिक शहरातील कालिका माता मंदिर परिसरात आंब्याचे स्टॉल आहेत. तसेच शहरातील मेणरोड परिसरात शालिमार परिसरात देखील आंबे विक्रीसाठी आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Nashik, Ratnagiri Hapus