लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 16 एप्रिल : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी संध्याकाळी माफिया आणि बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण यूपी हादरून गेली आहे. याच घटनेची पुनरावृत्ती नाशिकमध्ये टळली आहे. शहरातील सिडको परिसरात सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील पूर्व वैमन्यासातून एकावर गोळीबार करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरून निघालं आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी असलेला राकेश कोष्टी हा सराईत गुन्हेगार आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे घटना? गुन्हेगारांना राजाश्रय दिल्याने हाणामाऱ्यांपर्यंत मर्यादित असलेली गुन्हेगारी गोळीबार करण्यापर्यंत कशी पोहचते याचा प्रत्यय सद्या नाशिककरांना येत आहे. रविवारी भरदिवसा राकेश कोष्टी या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर पूर्व वैमानस्यातून गोळीबार करण्यात आला. राकेश कोष्टी हा देखील सराईत गुन्हेगार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत माथाडी संघटनेचं पदही मिळवलं होतं. मात्र, या नंतरही तो गुन्हेगारी जगतपासून दूर गेला नाही. राकेश कोष्टी याची नाशिक मधीलच जया दिवे टोळीसोबत शत्रुत्व कायम होतं. एकमेकांच्या टोळीवर हल्ले करणे आणि आपलं अस्तित्व टिकवणे हे सुरूच राहिलं. यातूनच रविवारी राकेश कोष्टीवर जया दिवे टोळीने भरदिवसा गोळ्या झाडल्या. यात राकेश कोष्टी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहे. वाचा - असद एन्काऊंटरचे नाशिक कनेक्शन; अतिकच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांकडून एकजण ताब्यात नाशिक शहर पोलिसांकडून गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्याबरोबरच सराईत गुन्हेगारांच्या धिंड काढण्यापर्यंतच्या कारवाया सुरू असताना, भरदिवसा शहरात झालेल्या गोळीबाराने शहरातील गँगवार पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून या गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय या गुन्हेगारीसाठी पोषक ठरतोय. त्यामुळे आता या घटनेनंतर तरी पोलीस राजकीय दबाव झुगारून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, ही गुन्हेगारी वेळीच रोखली नाही तर शहरात टोळी युद्ध भडकायला वेळ लागणार आहे.