येवला, 1 जून : किरकोळ कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून जन्मदाता पित्याने तरुण मुलाचा दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना येवल्यामध्ये घडली आहे. गोकुळ आहिरे असे या मुलाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गोपीनाथ आहिरे याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .या घटनेमुळे येवला परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील गोपीनाथ अहिरे हा मुलगा गोकुळ व इतर कुटुंबियांसोबत राहत होता. रात्री पिता-पुत्रात किरकोळ कारणावरून वाद झाला. पाहता-पाहता वाद इतक्या विकोपाला गेला की रागाच्या भरात पित्याने आपल्या पोटच्या तरुण मुलाचा दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे,पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी पित्याला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि विचारपूस केली असता आपणच मुलाचा खून केल्याचा कबुली जबाब त्याने दिल्याचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे यांनी सांगितले आहे, याप्रकरणी येवला तालुका पोलीस स्थानकात आरोपी गोपीनाथ विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मात्र क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या पित्यानेच मुलाचा खून केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







