ही दोस्ती तुटायची नाय.., एकत्रच निघाली दोन मित्रांची अंत्ययात्रा, अख्खे गाव रडले!

ही दोस्ती तुटायची नाय.., एकत्रच निघाली दोन मित्रांची अंत्ययात्रा, अख्खे गाव रडले!

त्या दोनही जिगरी दोस्तांचा एकाच वेळी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत कुटुंबासोबतच अख्ख गावही रडले आणि या मित्रांना डबडबलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.

  • Share this:

नाशिक, 02 नोव्हेंबर:  शाळा आणि कॉलेजमधली निखळ मैत्री (School and College Friend) म्हणजे एक वेगळं जगच असतं. दोस्तीच्या आणभाका घेत एकत्र राहणाऱ्या दोन मित्रांना एकाच वेळी मृत्यू आल्याची ह्रदयद्रावक घटना नाशिक जिल्ह्यात (Nashik District) घडली आहे. पोहायला गेलेल्या दोन मित्रांपैकी एक मित्र बुडायला लागला आणि त्याला वाचवायला दुसरा मित्र गेला. त्या खोल पाण्याने त्याला आपल्यात ओढून घेतलं. त्यामुळे त्या दोनही जिगरी दोस्तांचा एकाच वेळी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत कुटुंबासोबतच अख्ख गावही रडले आणि या मित्रांना डबडबलेल्या डोळ्यांनी निरोप दिला.

नाशिक जिल्ह्यातील मुंगसे-टाकळी शिवारातील ही घटना आहे. कुरण तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी 1 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली,

राहुल राजेंद्र सागर (वय 19) व प्रसाद खंडेराव सूर्यवंशी (वय 19, दोघे रा. मुंगसे) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन तरुण मुलांच्या मृत्यूमुळे मुंगसे गावावर शोककळा पसरली आहे.

प्रसाद हा खंडेराव सूर्यवंशी यांचा एकुलता एक मुलगा होता. तर राहुलला एक भाऊ आहे. एकुलत्या मुलाच्या अकाली निधनामुळे सूर्यवंशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

‘माझी चिमुकली गेली..’, आईने फोडला हंबरडा; सगळ्यांच्या काळजाचं झालं पाणी!

परतीच्या पावसामुळे  मुंगसे-टाकळी  आणि वाके या गावांजवळ असलेलं कुरण तलाव पूर्णपणे भरला आहे. त्या तलावाजवळच या तरुणाच्या कुटुंबीयांची शेती होती. रविवारी प्रसाद आणि राहुल हे दोघेही मित्र शेतात भेटले होते. त्यानंतर फिरफिरत दोघेही जण तलावाकडे गेले. दोघे तलावाच्या किनाऱ्यावर अंघोळी करण्यासाठी उतरले.

पण, एकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक जण बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने धाव घेतली. पण, दोघेही पाण्यात बुडाले. नजीकच असलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर दिवाळी आधी मिळणार गोड बातमी- नितीन राऊत

ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणि तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही मृतदेह रात्री मुंगसे गावात आणण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी  तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 2, 2020, 5:15 PM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या