नाशिक, 4 फेब्रुवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी गौप्यस्फोट केले आहेत. सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'स्क्रीप्ट तयार होती, षडयंत्र रचलं गेलं. आमच्या माणसाला 10 तास थांबवलं. १२.३० वाजता दिल्लीतून नाव दिल्लीतून जाहीर केलं गेलं, दुसरी कुठलीही उमेदवारी दिल्लीतून जाहीर केली गेली नाही. हा षडयंत्राचा भाग आहे, हे स्क्रीप्टेड होतं. बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजीतला उमेदवारी मिळू नये यासाठी, आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठी ही स्क्रीप्ट लिहिली गेली. आमच्या परिवाराला पक्षाबाहेर ढकलण्याचं षडयंत्र रचलं गेलं', अशी टीका सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
'राहुल गांधी भारत जोडो म्हणतात, प्रेम करा म्हणतात, पण या राज्यातल्या काही काँग्रेस नेत्यांनी द्वेषापोटी आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला', असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
चुकीचा एबी फॉर्म दिला, पटोलेंवर घणाघात
'पक्षाला आणि एचके पाटील साहेबांना आम्ही हे कळवलं. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो, कारण हे तिकीट दिल्लीतून मिळतात, त्यांनी सांगितलं कोरा एबी फॉर्म पाठवला आहे. अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी 2 जानेवारीला एबी फॉर्म पक्षाकडे मागितला. त्यांनी नागपूरला बोलावलं, तिथे माझा माणूस गेला. 10 तास त्या माणसाला बसावं लागलं, तेव्हा त्याला नाना पटोले यांनी फॉर्म दिला. 11 तारखेला तो फॉर्म घेऊन पोहोचला. बंद पाकीट फोडलं तेव्हा दोन्ही एबी फॉर्म पाठवले ते नाशिकचे नव्हते. एक औरंगाबाद आणि दुसरा नागपूर मतदारसंघाचा एबी फॉर्म आम्हाला दिला,' असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
'काँग्रेस प्रदेश कार्यायलाने असा फॉर्म का दिला? हा माझा प्रश्न आहे. माझा भाजपकडून लढण्याचा डाव असता तर मी त्यांना चुकीचे फॉर्म आले असं सांगितलं नसतं. त्यानंतर त्यांनी पाठवलेला फॉर्म सुधीर तांबे यांच्या नावाने दिला. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं गेलं. प्रदेश काँग्रेसने यावर उत्तर दिलं नाही. हे सगळं बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आलं,' असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.
'एचके पाटील यांनादेखील मी फोन केले, त्यांनी फोन घेतले नाही. नाना पटोले यांचा फोन बंद होता. मी नॅशनल काँग्रेसचे नाव फॉर्मवर टाकले होते, मात्र मी एबी फॉर्म न जोडल्याने तो फॉर्म अपक्षमध्ये कनव्हर्ट झाला. मला भाजपमध्ये ढकलण्याचं काम केलं गेलं. 12 तारखेला मला एचके पाटील यांचा फोन आला, त्यांना मी सगळी अडचण सांगितली. मला पाठिंबा जाहीर करा, असं मी त्यांना सांगितलं. मी महाविकासआघाडीच्या नेत्यांना भेटलो. मला पाठिंबा देण्यासाठी मी सगळ्यांना भेटलो. मला पाठिंब्यासाठी त्यांनी पत्र लिहायला लावलं. मला माफी मागायला लावली, मी माफीही मागितली,' असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.
'माफी मागत असताना आम्हाला धोका दिला, फसवलं असं नाना पटोले बोलत गेले. एकीकडे केंद्रीय नेतृत्व बोलत असताना राज्य नेतृत्व डाव आखत होतं. त्यांनी महाविकासआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून टाकला,' अशी टीका सत्यजीत तांबे यांनी पटोले यांच्यावर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole