नालासोपारा, 29 जून : नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका येथे काल रात्री एका टेम्पोमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी आता महत्त्वपूर्ण खुलासा झाला असून सदर महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
टेम्पोमध्ये आढळलेला मृतदेह बाजूलाच असणाऱ्या प्रियंका अपार्टमेंटमधील महिलेचा असल्याचं पोलीस तपासात उघड झाले असून याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मयत नगीना आशिष यादव या घरातून एकट्याच बाहेर निघाल्या होत्या, हे सीसीटीव्हीत कैद झालं होतं.
याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात तिचा पती आशिष याने मिसिंग ची तक्रार दिली होती. रविवारी 7 च्या सुमारास चंदन नाका येथे एका पिकप टेम्पोमध्ये गोणी मधून वास येत असल्याने एका टेम्पोचालकाने टेम्पो स्टॅन्डचे अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावलं आणि त्यानंतर पोलीस तपासात नगीना यादव हिचा खून गळा आवळून व गळा चिरून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र नेमका हा खून कोणी केला व का केला याबाबतची माहिती अद्याप उघड झाली नसून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
नक्की काय घडलं होतं?
टेम्पोमध्ये गोणीमधून वास येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावलं. टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर हे तिथं आल्यानंतर टेम्पोतील गोणीत मृतदेह असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ती गोणी उघडी करून पाहिलं तर समोर एका महिलेचा मृतदेह होता. हे पाहून तिथं उपस्थित असलेले सर्वजणच हादरून गेले. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nalasopara, Nalasopara news