भंडारा, 24 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. चोरीच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. स्वयंपाक खोलीच्या ओट्यावरून दागिन्यांची पोटली चोरल्याची घटना घडली. याठिकाणाहून तब्बल सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दागिन्यांची पोटली आणि रोख रक्कम हँडबॅगमध्ये ठेवून ती स्वयंपाक खोलीतील ओट्यावर ठेवली होती. यातच संधी साधून चोरट्याने स्वयंपाक खोलीतील स्लायडिंग खिडकीतून हात घालत दागिन्यांची पोटलीच लांबवली. यात दागिने व रोख रकमेसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेले. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्हाच्या कारधा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गिरोला येथे अनिल अंबादास गुल्हाणे यांच्याकडे घडली आहे. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत.
अनिल गुल्हाणे हे गिरोला येथे डॉ. माहेश्वरी यांच्या घराजवळ राहतात. घटनेच्या दिवशी म्हणजे ते गिरोला येथे आपल्या पत्नीसह आले. यावेळी त्यांच्या पत्नीने सोबत आणलेली हँडबॅग व अन्य सामान स्वयंपाक खोलीतील ओट्यावर ठेवले. या हँडबॅगमध्ये सोनेचांदीचे दागिन्यांसह रोख पाच हजार रुपये असा एकूण 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
मात्र, याचवेळी चोरट्याने संधी साधून स्वयंपाक खोलीतील स्लायडिंग खिडकी उघडून ओट्यावर ठेवलेली दागिन्यांची पोटली हात घालून पळविली. घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Crime