नागपूर, 30 जानेवारी : हिंगणा तालुक्यातील मोहगाव-झिल्पी तलाव पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हा तलाव हिंगणा शहरापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे. तसेच नागपूर शहराला लागून असल्याने शहरातील पर्यटक या तलावाकडे आकर्षित होत असतात. मात्र, यातील काही हौसेपोटी जीव गमावून बसतात. अशीच एक घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी 15 ते 20 मित्र या परिसरात आले होते. पार्टीनंतर तलावात पाय धुण्यासाठी गेलेल्या एका मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी (30 जानेवारी) अग्निशामक दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत आशिष दिगंबर मराठे हा मूळ निवासी भंडारा जिल्ह्यातील असून सध्या खापरी पुनर्वसन कॉलनी येथे वास्तव्याला आहे. तो ॲमेझॉन कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. ॲमेझॉन कंपनीतील सुरक्षा गार्ड म्हणून काम करणारे 15 ते 20 मित्र प्रदीप बावनकर यांच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मोहोगाव (झिल्पी) तलाव येथे गेले. वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर आशिष मराठे हा पाय धुण्यासाठी तलावात गेला. खोलवर पाण्यात गेल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मदतीसाठी अतुल खडसे व दोन मित्रही धावले. मात्र, आशिष हा पाण्यात खोलवर गेल्याने घाबरून मदतीसाठी गेलेले हे मित्र तलावाबाहेर आले. बराच वेळ मित्रांनी तलावावर त्याचा शोध घेतला. मात्र, तलावात बुडालेला आशिष बाहेर आला नाही.
वाचा - 'ती' रात्री 2 वाजता स्टेशनवर आली; घरी जाण्यासाठी रिक्षा पकडला, पण वाटेत घडलं भयंकर!
घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना मिळतात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ यांनी अग्निशामक दलाच्या पथकाला प्रसारण केले. या पथकातील कर्मचारी दिनकर गायधने व शरद दांडेकर यांनी तलावात शोध मोहीम राबवली. मात्र, रात्री अंधार पडल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली. आज सकाळी 6 वाजता पुन्हा अग्निशामक दलाने शोध मोहीम सुरू केली असता आशिषचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur