यवतमाळ, 1 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत नवऱ्याने पत्नीला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. हे दोन्ही पती आणि पत्नी व्यसनाधीन होते. ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील पंचशीलनगरमध्ये घडली. दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोला केलेल्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यानंतर सायंकाळी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पत्नी आणि पत्नी दोघेही दारूच्या आहारी गेले होते आणि नशेत असताना त्यांचे भांडण झाले. यातून ही घटना घडली. वैशाली उत्तम गाडेकर (35) असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली आणि तिचा नवरा उत्तम हे दोन्ही नवरा बायको रविवारी सकाळी दारू प्यायले. यातूनच दोघांमध्ये वाद झाला. यावेळी उत्तमने त्याची पत्नी वैशालीला काठीने, नंतर गुंडाने बेदम मारहाण केली. यात वैशालीचा गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मृत्यू झाला. या दोघांमध्ये दारू पिऊन नेहमीच वाद व्हायचे. त्यामुळे शेजाऱ्यांनीही सुरुवातीला याकडे लक्ष दिले नाही. मात्र, घरातील तीन वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा सारखे रडत असल्याने सायंकाळी घरात डोकावून बघितले. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी वैशालीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हेही वाचा - आईच्या बॉयफ्रेंडच्या मुलासोबत अफेअर, प्रेमासाठी लेकीने असा रचला डाव; थेट मर्डर याप्रकरणी वैशालीचे वडील ज्ञानेश्वर बारकू कोमटी (रा.उत्तरवाढोणा) यांनी मुलीचा खून झाल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून लोहारा पोलिसांनी आरोपी नवरा उत्तम गाडेकर (40) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नवरा सध्या फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.