मुंबई, 27 जुलै : ‘आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक… गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? असा थेट सवालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महामुलाखतीचा दुसरा भाग आज शिवनेसेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली? या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट उत्तर दिले. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक… गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय?असा सवालच उद्धव ठाकरेंनी केला. ‘त्यांची लालसा! स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. मी कधी शिवसेनाप्रमुखांशी तुलना केली नाही आणि हे बघितल्यानंतर मला नाही वाटत, भाजप त्यांना कधी पुढे करील. नाही तर नंतर ते नरेंद्र भाईंशी तुलना करतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी पण अडीच वर्षं मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही. तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कुणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झालं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘हे खासदार गेल्या निवडणुकीत पडले असते तर काय झाले असते हो? हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते आता अडीच वर्षांनी पडले असे मी समजतो,असं स्पष्ट उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. ‘माझ्या मनात हेच आले की, हे सगळे… यातले अनेक जण… त्यांनी कितीही काही म्हणो. माझ्या कुटुंबाचेच घटक होते. मी भेटत नव्हतो! अहो, माझ्या ऑपरेशनच्या काळात मी हलू शकत नव्हतो तेव्हा भेटू काय शकणार होतो. माझे हात-पाय हलत नव्हते. इतर वेळी ‘हे’ आमच्या कुटुंबातीलच एक होते. निधी वगैरे दिला नाही म्हणाल तर त्या दिवशी तर अजित पवारांनी सांगितलेय की, ह्यांच्या एका खात्याला बारा हजार कोटी दिले. काही ठिकाणी शेवटच्या काळात असमानता आहे असं मला वाटलं तेव्हा काही निधीवाटपाला मी स्थगितीही दिली होती. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित दादा, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरू होती की, निधीवाटपात अशी असमानता असेल तर हा प्रश्न आपण सोडवायला हवा…आणि अधिवेशन सुरू असताना अशोकराव चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता, असा खुलासाही ठाकरेंनी केला. ‘माझ्या मनात पाप नव्हतं. मी तुम्हाला बोलवत होतो की, माझ्यासमोर येऊन बसा, बोला. की समजा राष्ट्रवादी तुम्हाला त्रास देतेय. मी त्यांना या शब्दांत सांगितलं होतं की, ज्या आमदारांना 2014 साली भाजपने दगा दिला तरीसुद्धा भाजपसोबत जायचंय? पण आम्ही गेलो भाजपबरोबर. 2019 सालीसुद्धा आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही. शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी याच आमदारांविरुद्ध भाजपने त्यांचे बंडखोर उभे केले होते असे याच आमदारांचे म्हणणे आहे. त्यांचेच अनुभव आहेत. म्हणजे भाजपला तेव्हा आणि आताही शिवसेना संपवायचीच होती. त्यांच्याबरोबर हे गेले, असा खुलासाच उद्धव ठाकरेंनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







