मुंबई, 18 सप्टेंबर : मुंबईच्या 23 वर्षांच्या सानिया शेखची मर्डर मिस्ट्री तब्बल 14 महिन्यांनी उलगडली आहे. सानियाच्या हत्येचा तपास करताना पोलीस खळबळजनक शेवटाकडे पोहोचले आहेत. सानियाचा नवरा आणि दिरानी मिळून तिची हत्या केली. बकरी ईदच्या दिवशी सानियाच्या पतीने तिचं शीर धडापासून वेगळं केलं. यानंतर त्याने भावाच्या मदतीने सानियाचं पार्थिव नाहीसं केलं. पोलीस अजूनही सानियाचं शीर शोधत आहेत. वसई पोलिसांनी शनिवारी सानिया शेखच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या दिराला अटक केली आहे. सानियाचा पती आणि दिराने तिची निर्दयीपणे हत्या केल्याचं पोलिसांनी ही मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केल्यावर सांगितलं. मागच्यावर्षी जुलै महिन्यात सानियाचं पार्थिव भुईगावमधल्या नाल्यात मिळालं होतं. शरिराचा वरचा भाग धडापासून वेगळा होता. पोलिसांना अजूनही सानियाच्या शीराचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी या हत्येबाबत अजूनही धक्कादायक खुलासे केले आहेत. सानियाची हत्या केल्याप्रकरणी तिचा पती आसिफ शेखला अटक केली आहे, तर आसिफचा भाऊ युसूफ शेखला पुरावे नष्ट करायला मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. युसूफने सानियाचं शीर नसलेलं पार्थिव एका सुटकेसमध्ये पॅक करून गाडीमध्ये टाकलं, यानंतर त्याने हे पार्थिव भुईगावच्या समुद्रात फेकून दिलं. 2017 साली आसिफ आणि सानिया यांचं अरेंज मॅरेज झालं. लग्नानंतर आसिफ शेख, त्याचे आई-वडील, भाऊ युसूफ शेख, सानिया आणि एक मुलगी नालासोपारा पश्चिममध्ये दोन खोल्यांच्या एका घरात राहत होते. लग्नानंतर आसिफच्या कुटुंबाने सानियाला हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली, असा आरोप सानियाचे काका जहूर मोकाशी यांनी केला आहे. सानियाच्या सासरचे तिच्या माहेरून पैसे आणि संपत्तीची मागणी करत होते. सानिया तिच्या माहेरच्यांशी 8 जुलै 2021 ला शेवटची फोनवर बोलली, यानंतर त्यांचं कधीच बोलणं होऊ शकलं नाही. मुलगी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी काका जहूर मोकाशी आणि अन्य काही नातेवाईक मुंबईत आले, तेव्हा सानियाच्या सासरच्यांनी नालासोपाऱ्याचं आपलं घर विकून चेंबुरला शिफ्ट झाल्याचं त्यांना समजलं. यानंतर सानियाच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे सानिया हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्याच महिन्यात सानियाचं शीर नसलेलं पार्थिव ताब्यात घेतलं आणि त्याची डीएनए टेस्ट केली, यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी महिन्यात पोलिसांना बेना बीचजवळ मानवी कवटी आणि काही हाडं मिळाली होती. हे सगळं तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं आहे. ही कवटी आणि हाडं सानियाचीच आहेत का, हे प्रयोगशाळेतल्या तपासानंतरच स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.