मुंबई, 27 जुलै : मुंबईत गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले तसेच दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्सजवळील रेल्वे रुळही पाण्याखाली गेले. तर शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावरील वाहतूक मंदावली. मरिन लाईन्स आणि इतर काही ठिकाणी पाणी उपसण्यासाठी पालिकेने पंपांचा वापर केला. चर्च गेट आणि मरीन लाइन्स स्थानकांदरम्यानच्या रुळांवर पाणी साचल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, पश्चिम रेल्वेने सांगितले की, रेल्वे सेवा विस्कळीत झाली नाही. काही भागात पाऊस आणि रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूक मंदावली होती. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने (IMD) गुरुवारी मुंबई आणि शेजारील रायगड जिल्ह्यात पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान खात्याने काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तर शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी, हवामान केंद्राने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की हवामान खात्याने शुक्रवारी मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस, 28 जुलैला सर्व शाळा बंद ठाणे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेक कुटुंबांना अनेक निवासी भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एवढेच नाही तर दोन प्रमुख महामार्गावरील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि मीरा-भाईंदरमधील अनेक सखल भाग, तर पालघर जिल्ह्यातील वसई आणि विरारमध्ये पूर आला आहे. वाचा - कल्याण-डोंबिवलीमध्ये तुफान पाऊस, रेल्वे ट्रॅक गेला पाण्याखाली, चाकरमानी लटकले VIDEO जोरदार प्रवाहामुळे नाल्यात पडलेला व्यक्ती गेला वाहून ठाणे जिल्ह्यातील कळवा शहरात गुरुवारी मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेला एक 32 वर्षीय तरुण एका छोट्या नदीजवळील नाल्यात वाहून गेला. ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, दोसा नावाची व्यक्ती सकाळी 11.30 वाजता छोट्या नदीजवळ मासेमारीसाठी गेली होती. जवळच्या नाल्यात पडली आणि जोरदार प्रवाहाने वाहून गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.