धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 20 जून : मुस्लीम धर्मीयांचा बकरी ईद हा सण काही दिवसांवर आलाय. या दिवशी बकऱ्याला कुर्बानी देण्याची प्रथा आहे. मुंबईसारख्या महानगरात कुर्बानी देण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी मुंबईतील एका तरुणानं खास ॲप तयार केलंय. कसं आहे ॲप? मोहम्मद अवेस कुरेशी असं या ॲप तयार करणाऱ्या मुंबईकराचं नाव आहे. त्यांनी सिटी बूचर बॉय हे ॲप तयार केलंय. मुंबईतील अनेक सोसायटीमध्ये कुर्बानी देण्यास परवानगी नसते. कधी जागेच्या अडचणीमुळे देखील कुर्बानी कशी द्यावी? हा प्रश्न उभा राहतो. त्यावेळी या ॲपच्या मदतीनं घरबसल्या कुर्बानीचा बकरा बुक करता येतो, असं कुरेशी यांनी सांगितलं. तुम्ही बुक केलेल्या बकऱ्याची मुंबईतील सर्वात मोठ्या देवनार कत्तलखान्यात कुर्बानी दिली जाते. त्यानंतर त्याच्या फ्रेश मटनाची फ्री डिलिव्हरी तुमच्या घरी केली जाते, अशी माहिती कुरेशी यांनी दिली.
कोव्हिड काळात सरकारनं कुर्बानीबाबत अनेक गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. त्यामध्ये ऑनलाईन कुर्बानी द्यावी असेही निर्देश देण्यात आले होते. त्यावेळी होणारी अडचण लक्षात घेऊन हे ॲप तयार करण्यात आले. हे ॲप वापरायला अगदी सोयीस्कर असून यामुळे लोकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो बकरा पसंत करून तुम्हाला हवा तो भाग किलो प्रमाणे बुक करून त्याचे पैसे भरून तुम्ही तो घरबसल्या मागवू शकतात. यामध्ये तुम्हाला त्या बकऱ्याचा संपूर्ण भाग किंवा हवा तो मोजका भाग बुक करता येतो. आगरी डाळ वजरी अन् भेजा फ्राय खाल्ला का? एकदा हा VIDEO पाहाच ग्राहकांमध्ये विश्वासहर्ता कायम राहावी यासाठी आम्ही ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंग द्वारे बकरा व्यवस्थित असल्याचा दाखवून त्याचा वजन वगैरे दाखवून त्याची कुर्बानी केल्यानंतर हायजेनिक पद्धतीने त्याची पॅकिंग करून ते ग्राहकांपर्यंत पोहचवलं जातं. सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात सध्या आमची सेवा सुरू आहे. तसेच येत्या काळात मटन सोबत चिकन त्याच प्रकारे सी फुड देखील या ॲप मध्ये उपलब्ध होतील, असं कुरेशी यांनी स्पष्ट केलं.