जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 40 वर्ष ज्याच्यासोबत संसार केला, त्याला शेवटचं पाहू शकली नाही पत्नी, VIDEO कॉलवर अंत्यदर्शन घेण्याची वेळ

40 वर्ष ज्याच्यासोबत संसार केला, त्याला शेवटचं पाहू शकली नाही पत्नी, VIDEO कॉलवर अंत्यदर्शन घेण्याची वेळ

40 वर्ष ज्याच्यासोबत संसार केला, त्याला शेवटचं पाहू शकली नाही पत्नी, VIDEO कॉलवर अंत्यदर्शन घेण्याची वेळ

चाळीस वर्षे ज्याच्याशी संसार केला त्या आपल्या जोडीदाराला त्याच्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष पाहता आलं नाही ही रुखरुख वासंती बांदेकर यांना अस्वस्थ करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिंधुदुर्ग, 18 एप्रिल : मुंबईत निधन झालेल्या आपल्या पतीचं अंत्यदर्शन व्हिडिओ कॉल करुन घेण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ गावी असलेल्या पत्नीवर आली. लॉकडाउनमुळे सारं काही ठप्प असल्यामुळे गेली चाळीस वर्षे ज्याच्याशी संसार केला त्या आपल्या जोडीदाराला त्याच्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष पाहता आलं नाही ही रुखरुख वासंती बांदेकर यांना अस्वस्थ करत आहे. चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर हे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात कर्मचारी होते. दीनानाथच्या रंगमंचावर त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांचा आविष्कार पाहिला होता. बांदेकरांना नाटकाचं प्रचंड वेड. दोडामार्ग तालुक्यातलं मोर्ले हे त्यांचं गाव. वासंती आणि त्यांचा त्याकाळातला प्रेमविवाह! बांदेकरांचं दोन मुलगे आणि सुनांसह वास्तव्य होतं अंधेरी पूर्वच्या साई नगरमध्ये. पण दरवर्षी न चुकता आपल्या पत्नीसह आपल्या मोर्ले गावी येण्याचं त्यानी कधी टाळलं नाही. मोर्ले गावात दरवर्षी रामनवमीला नाट्योत्सव होतो. त्यामुळे बांदेकरही रामनवमीला आवर्जून मोर्लेत यायचेच. मोर्ले गावात सादर होणाऱ्या नाटकांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान असायचं. यावेळच्या रामनवमीलाही ते येणार होते. म्हणूनच होळीला गावी आलेल्या पत्नीला त्यांनी गावीच थांबण्यास सांगितलं होतं. पण लॉकडाउन सुरू झालं आणि गावी येण्याचे सगळे मार्गच बंद झाल . त्यातच कर्करोगांमुळे बांदेकर यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे ते रामनवमीला मोर्ले गावी येऊ शकले नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीत 16 एप्रिलला दुपारी दोन वाजता 67 वर्षांच्या चंद्रकांत बांदेकरांचं अकाली निधन झालं. बांदेकरांच्या मुलांनी ही घटना मोर्लेतल्या पोलीस पाटील , सरपंच ,माजी सरपंच यांना कळवली. गावी कुणी नातेवाईक नसल्याने बांदेकरांच्या मोर्लेतल्या घरी त्यांची पत्नी वासंती एकटीच होती. पत्नीला मुंबईला नेण्याचे झाल्यास काय काय करावे लागेल याच्या तयारीला आधी गावकरी लागले. बांदेकरांच्या मुलाचं आणि गावकऱ्यांच बोलणं सुरू होतं. बांदेकरांचं डेथ सर्टिफिकेट गावकऱ्यांपर्यत पोहोचलं. गाडीसाठी लागणाऱ्या परवानगीची कागदपत्रेही तयार झाली. पण लॉकडाउनमुळे वासंती याना मुंबईला घेवून जायचे झाल्यास त्यांच्यासोबत जाणाऱ्या गावातील अन्य दोघांना सक्तीने पुढचे पंधरा दिवस क्वारन्टाईन होउन राहावं लागणार होतं. शिवाय अंधेरी हा तसा हॉटस्पॉट एरिया असल्यामुळे वासंती यांच्यासोबत जायला कुणी तयारही होईना. आपल्याला आपल्या पतीचे अंत्यदर्शन जाता येणार नसल्याचं कळाल्यावर वासंती यांच्या दु:खाला सीमा उरली नाही . काहीही करा पण माझ्या नवऱ्याचा चेहरा एकदा तरी पाहू द्या अशी काळीज पिळवटून टाकणारी विनवणी त्या गावकऱ्यांना करू लागल्या. शेवटी गावकऱ्यानी बांदेकरांच्या मुलाला ही परिस्थिती सांगितली आणि मग अंधेरीतल्या त्यांच्या थोरल्या सुनेने मोर्लेचे पोलिस पाटील तुकाराम चिरमुरे यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. त्या मोबाईलवरुन आपल्या पतीचा चेहरा पाहताच वासंती यानी टाहो फोडला , " बांदेकर तुम्ही मला फसवलंत! अंधेरीतल्या मुलांनाही आईला पाहून दु:ख अनावर झालं. शेवटी व्हिडिओ कॉलवरच पुढचे सगळे विधी एकमेकाना दाखवावे लागले. खरंतर अंधेरीतल्या त्यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर संभाजीनगरमध्ये मोर्ले गावचे काही गावकरी राहतात . पण हा सर्व एरिया हॉटस्पॉट असल्यामुळे तिथल्या कुणालाही बाहेर पडून बांदेकरांच्या घरी येता आलं नाही. शेवटी पाच जणानी अॅम्ब्युलन्समधून जाऊन बांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अशी वेळ आपल्यावर येईल असं स्वप्नात देखील वासंती याना वाटलं नव्हतं. चाळीस वर्षे ज्याच्यासोबत राहिलो त्या आपल्या प्रियकर पतीचा चेहरा आपण प्रत्यक्ष पाहू शकलो नाही याचं त्याना होत असलेलं दु:ख सांगताना मोर्लेचे गावकरीही गहिवरून गेले. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात