मुंबई, 17 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Case) एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आल्यानंतर आता संपूर्ण मुंबई पोलीस दलातच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर आता थेट मुंबई पोलीस आयुक्तांचीच (Mumbai Police Commissioner) उचलबांगडी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी आता हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) यांच्याकडे देण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. 'सरकारने मोठा निर्णय घेतला असून हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत, तर परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे. तसंच रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे,' असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.
सरकारचा मोठा निर्णय श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस दलातील बडे अधिकारी अडचणीत येणार?
ज्यावेळेस स्फोटकांनी भरलेली हिरव्या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यावेळेस त्यांनी तपासात बरीच गडबड केल्याचा संशय एनआयएला आहे. या सर्व गोष्टी सचिन वाझे यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांपासून लपवून ठेवल्या होत्या.
5 मार्चला मनसुख मिश्रीलाल हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्यानंतर हिरेन परिवाराकडून थेट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांना वरिष्ठांनी बोलावून या आरोपांबाबत विचारणा केली असता त्याही वेळी सचिन वाजे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. सोबतच पुन्हा एकदा आपण मनसुख मिश्रीलाल हिरेन याला ओळखत नसल्याचं सांगितलं.
या गोष्टीवरून एक मुद्दा स्पष्ट होतो तो म्हणजे हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली गाडी मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथे पार्क करण्यात आली आणि या प्रकरणात ज्या काही घडामोडी घडल्या, जे काही लपवलं, याबाबत अतिशय कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. आता या सचिन वाझे यांच्या प्रकरणाची मूळे नेमकी कुठपर्यंत आहेत, हे आगामी काळातच स्पष्ट होतील. मात्र सध्या तरी याप्रकरणात इतरही काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.