मुंबई, 24 जून : शिक्षणासाठी तुमचे वय नाही तर लागते ती जिद्द आणि चिकाटी. याचं जिद्दीनं वयाच्या 53 व्या वर्षीय अनिल वायदंडे यांनी आपले दहावी पास (10th exam) होण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे. नुकताच महाराष्ट्र राज्याचा दहावीचा म्हणजेच एस.एस.सी बोर्डाचा निकाल लागला. राज्यभरात कोकण विभागाचा सर्वात जास्त निकाल लागला असून हजारो विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. या विद्यार्थ्यांपैकीचं एक अनिल वायदंडे यांनी 64 टक्के मिळवत यश संपादित केले आहे. (passed 10th class examination) त्यांच्या यशाबद्दल आपण जाणून घेऊया...
अनिल वायदंडे हे गेली 12 वर्ष मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात सहायक कक्ष या पदावर काम करत आहेत. सण 1992 मध्ये ते प्रथम परीचारक कक्ष ह्या पदावर नियुक्त झाले होते. त्यानंतर काही वर्षात सहायक कक्ष या पदावर त्यांची पदोन्नती झाली. मात्र, या पुढील पदावर पदोन्नती होण्यासाठी त्यांचे शिक्षण अपुरे होते. त्यामुळे त्यांनी 2022 च्या एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेला बसण्याचा त्यांनी निश्चय केला.
अनिलजी सांगतात की, मी ज्या पदावर रुजू झालो. त्याच पदावर मला सेवानिवृत्त व्हायचे नव्हते. म्हणून यंदा परीक्षेला बसण्याचा निश्चय केला. काही मित्रांच्या मदतीने लालबाग येथील वि.टी. हायस्कुल या रात्रशाळेत प्रवेश घेतला. सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत नायर रुग्णालयात आपली सेवा बजावून संध्याकाळी पुन्हा सहा ते नऊ शाळेत अभ्यास करायचा असा माझा दिनक्रम होता. सराव करत, अडीअडचणी सोडवत, अभ्यास करून अनिल यांनी दहावीच्या परीक्षेत 64 टक्के मिळवले आहेत. त्यांच्या या यशासाठी त्यांचे सहकारी तसेच कुटुंबीय ही खूप आनंदी आहेत.
त्यांच्या यशा बद्दल बोलताना त्यांचे मित्र सुनील माने म्हणतात की, इथे मिळेल त्यांना विचारत पुस्तक घेऊन गेले वर्षभर त्यांनी अभ्यास केला आहे. आता पदोन्नतीसाठीची त्रुटी त्यांनी भरून काढली आहे. सहकारी, अंकिता तळाशीलकर सांगतात की, एवढ्या वयातही त्यांनी परीक्षा देणं हे खुप प्रेरणादायी आहे. इतरांनी ही प्रेरणा त्यांच्याकडून घेतली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 10th class, Mumbai, Ssc board, Success story