नवी दिल्ली, 21 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी तानाजी सिनेमाला वापर करण्याता आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी अमित शहा असलेला चेहरा दाखविण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संभाजीराजे यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी”, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. याआधी ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. भाजपच्या एका नेत्याने या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली होती. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 21, 2020
सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.
या मॉर्फिंगमुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्तं केला जातोय. दिल्ली निवडणुक प्रचारात भाजपच्या सोशलमीडिया टीमकडून असे माँर्फिंग केलेले प्रोमो व्हायरल केल्यामुळे पुन्हा मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे. तानाजी सिनेमाचा प्रोमो एडिट करून त्याचं शहाजी असं नाव करण्यात आलंय. तर उदयभान राठोड यांच्या भूमिकेत अरविंद केजरीवाल यांना दाखवण्यात आलंय. तानाजींच्या भूमिकेत अमित शहा दाखवण्यात आलेत. याच प्रोमोत नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा मोठा वाद होऊन गदारोळ होणार हे नक्की. ही चित्रफित तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, असे यावरील शेकडो प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यंना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली बंद करणारे या व्हिड़िओवर काय प्रतिक्रिया देतात ते पाहायला हवे, असे राऊत यावेळी म्हणाले.