नवी दिल्ली, 12 एप्रिल : साधारण जून महिन्यात भारतामध्ये मान्सूनचं (Monsoon) आगमन होतं. भारतातील मान्सून पूर्णपणे हिंदी महासागर (Indian Ocean) आणि अरबी समुद्रातून (Arabian Sea) हिमालयाकडे येणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर (Seasonal Winds) अवलंबून असतो. जेव्हा हे वारे भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील पश्चिम घाटावर आदळतात तेव्हा भारत आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. संपूर्ण दक्षिण आशियात जून ते सप्टेंबर या काळात हे वारे सक्रिय असतात. या वाऱ्यांचा अभ्यास करून सरकारी आणि विविध खासगी कंपन्या मान्सूनचा अंदाज लावतात. भारतातील सर्व शेतकरी मान्सूनच्या या अंदाजावर अवलंबून असतात. आता, भारतातील अग्रगण्य वेदर फॉरकास्टिंग (Weather Forecasting) आणि अॅग्रीकल्चर रिस्क सोल्युशन (Agriculture Risk Solution) कंपनी असलेल्या स्कायमेटनं (Skymet) 2022 या वर्षातील मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी 98 टक्के (+/- 5 टक्के इरर मार्जिनसह) पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी आपल्याकडे मान्सून ‘सामान्य’ राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी 880.6 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जो एलपीएच्या 98 टक्के इतका असेल. स्कायमेटनं 21 फेब्रुवारी 2022 रोजी यावर्षीचा सर्वात पहिला मान्सून फॉरकास्ट जाहीर केला होता. आपल्या या पहिल्या प्राथमिक अंदाजावर ठाम राहत स्कायमेटनं यावर्षी मान्सून सामान्य असल्याचं म्हटलं आहे. या वर्षी एकूण 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. स्कायमेटचे सीईओ योगेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ‘गेल्या दोन पावसाळ्यांवर ला निना इव्हेंट्सचा (ला निना ही एक महासागरीय आणि वातावरणीय घटना आहे) परिणाम झाला होता. पूर्वी, ला निना हिवाळ्यात झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु, आता पूर्वेकडील वाऱ्यांच्या तीव्रतेमुळं त्याचं पुनरागमन थांबलं आहे. सध्या ला निना आपल्या सर्वोच्च स्थितीमध्ये पोहचलेलं आहे. तरी देखील नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी पॅसिफिक महासागर शांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सहसा मान्सूनवर परिणाम करणारं ला निनो यावर्षी अडथळा ठरणार नाही. पण, मान्सूनच्या वर्तनातील आकस्मिक बदलांमुळं दीर्घ ड्राय स्पेलनंतर मुसळधार पाऊस (Intense Rains) पडण्याची अपेक्षा आहे.
हे वाचा - व्यक्तीच्या मृत्यूनंतर PAN आणि आधारकार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून काय कराल? वाचा सविस्तर
जरी थ्रेशोल्ड मार्जिनच्या जवळील कल निगेटिव्ह असला तरी हिंद महासागराचा द्विध्रुव (Indian Ocean Dipole) तटस्थ आहे. मॉन्सूनला एल निनो-सदर्न ऑसिलेशनच्या (ENSO) तटस्थ परिस्थितीवर स्वार व्हावं लागेल. विशेषत: सिझनच्या सेकंड हाफमध्ये इंडियन ओशन डायपोलकडून होणार्या प्रतिकाराचा मान्सूनला सामना करावा लागेल. यामुळे मासिक पर्जन्यमान वितरणात बदल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या भौगोलिक वितरणाचा विचार केल्यास, राजस्थान, गुजरात तसंच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये संपूर्ण हंगामात पावसाची कमतरता जाणवेल, अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत केरळ आणि कर्नाटकात कमी पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या उत्तर भारतातील कृषी क्षेत्रांत आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. पावसाळ्याच्या पूर्वार्धात जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनची चांगली सलामी देईल अशी अपेक्षा आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर (JJAS) मध्ये मान्सूनची संभाव्यता खालीलप्रमाणे आहे : • अतिरिक्त पावसाची शक्यता 0 टक्के (LPA पेक्षा 110 टक्के अधिक मोसमी पाऊस) • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 105 ते 110 टक्क्यांदरम्यान असतो) • सामान्य पावसाची शक्यता 65 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 96 ते 104 टक्क्यांदरम्यान असतो) • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 25 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 90 ते 95 टक्क्यांदरम्यान असतो) • दुष्काळाची शक्यता 0 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 90 टक्क्यांपेक्षा कमी आहे) 2022 मध्ये कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल: • 166.9 मिमी या सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये 107 टक्के पाऊस पडू शकतो • सामान्य पावसाची शक्यता 70 टक्के. • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 10 टक्के 285.3 मिमी या सरासरीच्या तुलनेत जुलैमध्ये 100 टक्के पाऊस पडू शकतो • सामान्य पावसाची शक्ययता 65 टक्के • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 15 टक्के 258.2 मिमी या सरासरीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 95 टक्के पाऊस पडू शकतो • सामान्य पावसाची शक्यता 60 टक्के • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के 170.2 मिमी या सरासरीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 90 टक्के पाऊस पडू शकतो. • सामान्य पावसाची शक्यता 20 टक्के • सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के • सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 70 टक्के