भंडारा, 15 सप्टेंबर : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेला रोजगार मेळावा चर्चेचा विषय ठरला आहे. या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि गावगुंड मोदी एकाच व्यासपीठावर दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्या गावगुंड मोदीला मारण्याच्या बाता नाना पटोले करत होते, त्यांच्याच व्यासपीठावर गावगुंड मोदीला नेमकं निमंत्रण कुणी दिलं? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जेवणाळा येथे एका कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘आपण मोदीला मारू शकतो आणि शिवा देऊ शकतो’, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नाना पटोले यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होऊ लागला होता. वाद वाढल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर लोकांना त्रास देणाऱ्या गावगुंड उमेश घरडे ज्याला मोदी म्हणतात, त्याच्याबद्दल बोलत होतो, असा खुलासा केला होता. त्यानंतर अचानक गावगुंड मोदी जिल्ह्याबाहेर गायब झाल्याने चर्चेला उधाण आलं, आणि आता आज लाखांदुरात काँग्रेसने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात तेही चक्क व्यासपीठावर गावगुंड मोदी उपस्थित दिसल्याने पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आपण गावगुंड मोदीला निमंत्रण दिले नसल्याचा खुलासा नाना पटोले यांनी केला असून आपण नाना पटोले यांना भेटण्यास आल्याचे गावगुंड मोदी उर्फ उमेश गरडे यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







