Home /News /maharashtra /

'तारक मेहता...' मालिका वादात, मराठीचा अवमान केल्याचा आरोप करत मनसे नेत्याने शेअर केला VIDEO

'तारक मेहता...' मालिका वादात, मराठीचा अवमान केल्याचा आरोप करत मनसे नेत्याने शेअर केला VIDEO

'या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल,' असं म्हणत अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिकाही घेतली आहे.

    मुंबई, 3 मार्च : छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही विनोदी मालिका आता वादात सापडली आहे. या मालिकेतील एका डायलॉगवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. तसंच हेच मराठीचे मारक असल्याचं म्हटलं आहे. 'या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल,' असं म्हणत अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका दृष्यात एक कलाकार 'मुंबई की आम भाषा हिंदी हैं' असं वाक्य उच्चारताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. याबाबतचा व्हिडिओ शेअर करत अमेय खोपकर यांनी आक्रमक इशारा दिला आहे. 'हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता. मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरू असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते,' असं म्हणत अमेय कोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत याआधीही मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील वर्षी ‘मिशन मंगल’ हा हिंदी चित्रपट मराठीमध्येही डब करुन प्रदर्शित होणार होता. मात्र अशाप्रकारे हिंदी सिनेमे मराठीत डब करुन प्रदर्शित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं तीव्र विरोध केला होता. मूळ ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटास किंवा तो प्रदर्शित होण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण तो मराठीत प्रदर्शित करण्यास आक्षेप आहे. असं मनसे चित्रपट सेनेकडून सांगण्यात आलं होतं. हेही वाचा-'विवाहित माणसाच्या प्रेमात पडू नका', कुमारी माता झालेल्या अभिनेत्रीने दिला सल्ला मराठी चित्रपटांना योग्य प्रमाणात शोज मिळत नाहीत, या मुद्द्यावरुन मनसेचं आंदोलन गेली अनेक वर्षं सुरु आहे. हिंदी सिनेमे जर मराठीत डब झाले तर मूळ मराठी चित्रपटांना शोज मिळण्यात आणखी अडचणी येतील, आणि याच कारणामुळे मनसे अशाप्रकारे हिंदी सिनेमे मराठी डब करुन प्रदर्शित करण्यास विरोध करत असल्याचं मनसे चित्रपट सेनेचं म्हणणं होतं. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहता अवघ्या दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतली होती.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amey khopkar, MNS, Tarak mehta ka ulta chashma

    पुढील बातम्या