अमरावती, 19 एप्रिल : बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना आज रेडियंट रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसापासून तापाने कण्हत दुखणे अंगावर काढत घरीच असणाऱ्या आमदार रवी राणा यांचा ताप वाढला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. तसंच रवी राणा आणि त्यांच्या पत्नी व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्नधान्य व मोफत भोजन, जीवनावश्यक धान्य, किराणा, सॅनिटायझर आदी साहित्य सातत्याने वाटप करताना रवी राणा यांना उन्ह लागले. त्यानंतर त्यांचा ताप 103 पर्यंत वाढला. खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर आनंद काकाणी व त्यांची टीम उपचार करत आहे.
हेही वाचा- कोरोना टेस्टिंगमध्ये महाराष्ट्रच नंबर वन! योगींचं उत्तरप्रदेश कितव्या स्थानी? वाचा संपूर्ण यादी
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा या दोघांचेही थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवले आहे. तपासणीनंतर याबाबतचा अहवाल समोर येणार आहे. सध्या रवी राणा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊनच्या काळात राणा पती-पत्नी मैदानात
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर मतदासंघातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या प्रत्यक्ष लोकांमध्ये जावून फिरत होत्या. 'गोर गरिबांच्या हक्काचे राशन पारदर्शीपणे घरपोच द्या. राशन वाटपात हयगय, दिरंगाई व काळाबाजार खपून घेणार नाही. जनतेशी बेईमानी करणाऱ्या राशन दुकानदारांना झोडल्याशिवाय राहणार नाही. काळाबाजार करणाऱ्या व वास्तविक दरापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या दुकानदारांना 6 महिने तत्काळ सक्त मजुरीची शिक्षा द्या. आप्तकालीन स्थितीत गोरगरीबांची अवहेलना सहन करणार नाही,' असा इशारा रवी राणा यांनी दिला होता.
संपादन - अक्षय शितोळे