अमरावती, 21 ऑगस्ट : राज्यात मागच्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. यामध्ये काही अपक्षांचा समावेश होते यातील आमदार बच्चू कडू यांचा सहभाग महत्वाचा होता. (MLA Bachchu Kadu) दरम्यान मागच्या दोन महिन्यातील राजकीय घडामोडीत मंत्रीमंडळाचा विस्तार झाला यामध्ये बच्चू कडूंना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती परंतु त्यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याचे काल (दि. 20) अमरावतीमध्ये दिसून आले.
आमदार बच्चू कडू आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार शनिवारी (ता. 20) अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी कृषी विभागातील रिक्त पदे आणि इतर प्रलंबित मुद्दे उपस्थित करत बंडखोरी करत त्यांनीच समर्थन दिलेल्या सरकारला कोंडीत पकडत प्रश्नांची सरबत्ती केली.
शेतकऱ्यांना बळ देणारा कृषी विभागच 'ऑक्सिजन' वर आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर वाढता ताण असून, राज्यात 80 टक्के कृषी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. हे प्रश्न आधी सोडवा, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी समर्थित सरकारला घरचा आहेर दिला.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार घेऊन गेलो होतो पण..,, गुलाबराव पाटलांचा मोठा खुलासा
कडू म्हणाले, की तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर जिल्हा मुख्यालयी नियुक्त केले जाते. त्यामुळे तालुकास्तरावर आधीच कर्मचारी संख्या कमी असताना प्रतिनियुक्तीमुळे बोटांवर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात हजर राहतात. त्याच कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण कृषिविषयक योजनांची अंमलबजावणी करणे व इतर कामे करावी लागतात. राज्यात कृषी कार्यालयाच्या इमारतींचा प्रश्नदेखील गंभीर आहे. अनेक ठिकाणी शासकीय रोपवाटिका परिसरात कृषी कार्यालये आहेत.
परंतु ती मोडकळीस आली असल्याने केव्हाही कोसळतील त्याची शाश्वती नाही, तर अनेक ठिकाणी भाड्याच्या घरात कृषी कार्यालये थाटण्यात आली आहेत. त्यापोटी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. राज्यात सुमारे 80 टक्के कार्यालय ही भाड्याच्या इमारतीत आहेत. हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. आमदार कडू यांच्या या मुद्दयावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार मात्र निरुत्तर झाल्याचे पाहावयास मिळाले.
हे ही वाचा : 'हे गद्दारांचं सरकार, शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री'; मध्यावधी निवडणुकांबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं भाकित
बैठकीला खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, प्रवीण पोटे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, आमदार संजय रायमुलकर, आमदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Aurangabad News, अमरावतीamravati, महाराष्ट्र amravati