भिवंडी, 20 जून : भिवंडी शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महानगरपालिका लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या संमतीकडून पंधरा दिवसांकरता संपूर्ण भिवंडी शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे . त्याविरोधात नाराजीचा सूर आळवणारे एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महिला महापौर यांच्या बद्दल अपशब्द वापरून वक्तव्य केले. खालिद गुड्डू यांच्या या असभ्य वक्तव्याचा भिवंडी शहरातील महिला वर्गाकडून निषेध नोंदवण्यात येत असून शहरातील महिलांनी शिवाजी चौक या ठिकाणी एकत्रित होत खालिद गुड्डू यांच्या छायाचित्रास काळे फासत त्यांच्या धिक्काराच्या घोषणा देत निषेध केला. याबाबत लवकरच मुख्यमंत्री व राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिला कल्पना शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान, भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच भिवंडी शहरातील लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच कोरोना रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त होण्याच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. काल शहरातील 149 तर ग्रामीण भागातील 31 असे तब्बल 180 रुग्ण एकाच दिवसात कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात एकाच दिवसात कोरोनाचे 67 नवे रुग्ण आढळले असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ग्रामीण भागात 30 नवे रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. शहर व ग्रामीण भागात एकूण 97 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 1145 वर पोहचला असून त्यापैकी 568 रुग्ण बरे झाले आहेत तर 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 505 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.