ईर्शाळवाडी, 20 जुलै : मी इर्शाळवाडी बोलतेय, मी जे जगले आणि भोगले त्याची कहाणी मी सर्वांना सांगणार आहे. इर्शाळगडाच्या कुशीत माझा जन्म कधी झाला हे मलाही आठवत नाही. खालापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेली मी छोटीशी वाडी. सुरुवातीला चार घरांना इर्शाळवाडी असं नाव मिळालं, किल्ल्याचं आणि माझं नामकरण या इथल्या देवीच्या नावावरुन पडल्याचं सांगतात. ठाकूर या आदिवासी समाजाच्या कित्येक पिढ्या माझ्या अंगाखांद्यावर वाढल्या. चार उंबऱ्यांची चौदा उंबरे झाले आणि चौदाचे कधी चाळीस झाले मलाही कळले नाही. कुडाच्या राहणारा माझा आदिवासी आता पक्क्या विटामातींच्या घरात राहू लागला होता. चाळीस-पन्नास घरांचं का होईना माझंही गोकुळ झालं होतं. वाडीत यायला रस्ता नव्हता निर्सगाचं लेणं लेऊन मी सुंदर दिसत होते. तशी तर माझी ओळख इर्शाळगडामुळेच आहे. दरवर्षी पावसाळ्यात इथे अनेक जण पर्यटनासाठी येतात. इर्थाळगडाच्या उत्तरेस कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड आहे. तर ईशान्येस माथेरान आहे. गडावरून पश्चिमेकडे मोरबे धरणाचे छान दृश्यं दिसतं. निसर्गाच्या सानिध्यात या गावातील सर्वांच्या उदारनिर्वाहाचं साधन इथली शेती. इर्शाळगडावरच पावसाळ्यातील वातावरण हे कुणालाही मोहात टाकणारं. याच गडावर अनेक ट्रेकर्स आणि पर्यटकांची पावलं पावसाळी पर्यटनासाठी वळतात. गडावर ट्रेकिंगसाठी जाताना जाणाऱ्या पर्यटकांना वाटेत हे गाव लागतं. पण, ज्या इर्शाळगडामुळे मी नावारुपाला आले, त्याच गडाच्या दरडी माझ्यावर काळ बनून कोसळल्या. रायगड जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. बुधवारी दिवसभर तुफान पाऊस पडत असल्यामुळे वाडीतील कुटुंब नेहमीप्रमाणे जरा लवकरच झोपी गेली होती, मात्र त्याच्या गावाभोवती असलेला डोंगरच त्यांच्यावर काळ बनून कोसळला. अचानक मोठा आवाज झाल्यामुळे जीवाच्या आकांतानं अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. पण, माझ्यावर अचानक कोसळलेल्या या संकटात माझ्या अंगाखांद्यावर वसलेली चाळीस घरं जमिनीखाली पुरली गेली आहेत. कुणी शेतात गेलं म्हणून तर कुणी मासेमारीला गेलं म्हणून वाचलं. बुधवारच्या दुर्घटनेनं माझ्या मनावर आघात केलाय. जो निसर्ग देवाचा आशीर्वाद मानलो जातो, ज्याने आजवर माझ्या अंगा-खांद्यावर वसलेल्या आदिवासींना सर्वस्व दिलं, तोच निसर्ग माझ्यावर कहर बनून कोसळला. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधकांपर्यंत, मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनी माझं हे विद्रूप रूप पाहिलं, त्यांनी मला पुन्हा वसवायची आश्वासनं दिली खरी, पण कुटुंबाशिवाय उभं तरी कसं राहायचं? जतन करायचं, संवर्धन करायचं, सुजलाम सुफलाम व्हायचं हे प्रत्येक वाडी-वस्तीचं स्वप्न. पण, माझ्यासाठी मात्र हे स्वप्न दिवास्वप्न ठरलं. शिवछत्रपतींच्या राजवटीच्या सुवर्ण इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही मी माझ्या हृदयात जपून ठेवल्या आहेत, पण, आज हे हृदय पिळवटून गेलंय. ज्या डोंगराच्या आधारानं वाढले, जो डोंगर माझा आधार होता, तोच डोंगर माझ्यासाठी आज काळ ठरला. माझ्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या शेकडो आदिवासींना पुरण्यासाठी माझ्याच छातीत खड्डे खणले जात आहेत,याहून मोठी शोकांतिका तरी काय म्हणता येईल?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







