मुंबई, 16 नोव्हेंबर : मुबईत गोवर साथीने थैमान घातले आहे. मागच्या काही दिवसांत आरोग्य विभागातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोवरच्या साथीने तब्बल 7 बालकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील आरोग्य खाते अचानक हाडबडून जागे झाले आहे. हे सर्व संशयित मृत्यू असल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे. याचबरोबर 61 जणांना अद्यापही लागण झाली आहे. तर 5 बालके अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व बालकांवर कस्तुरबा बालरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मागच्या काही दिवसांपासून गोवरच्या साथीने मुंबईत थैमान घातले आहे. मुंबईत गोवर रुग्णांची संख्या 142 असून यात गोवंडी, देवनार, मानखुर्द, बैंगणवाडी, शिव- जीनगर या चेंबूर परिसरातील सर्वाधिक 44 बालकांचा समावेश आहे. त्याखालोखाल पी / नॉर्थ विभागातील मालाड, मालवणी, कुरार व्हिलेज या झोपडपट्टीबहूल विभागातील 40 गोवर रूग्णांचा समावेश आहे.
हे ही वाचा : फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी या 4 फळांचा आहारात करा समावेश
गोवर रोगाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने 30 ते 40 आशा स्वयंसेविकांची नेमणूक करून घर- घरी रुग्णशोध मोहीम राबवली आहे. सक्रीय आणि संशयित रुग्णांची माहिती देण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कंट्रोल रूम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान तातडीने पावले उचलत कस्तुबा, राजावाडी, गोवंडीतील शताब्दी आणि शिवाजी नगरमधील प्रसूती गृह आदी रुग्णालयात गोवर उपचार केंद्रेही सुरु करण्यात आली आहेत.
मुंबईतील विविध विभागातुन येणाया गोवरच्या रूग्णांवर उपचारासाठी कस्तुवा रुग्णालयात महापालिकेने 83 बेडची व्यवस्था केली आहे. गरज भासल्यास आणखी बेड वाढविण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. मृत्युमुखी पडलेली बालके गोवरचेच बळी ठरले का, हे ‘मृत्यू समितीचा अहवाल तीन ते चार दिवसांत आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मुंबईतील गोवंडी येथे गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गोवंडी ते कस्तुरबा रुग्णालय हे अंतर जास्त होत असल्याने पालिकेकडून शताब्दी या रुग्णालयात 10 बेडची व्यवस्था करण्या आली आहे. तसेच या परिसरातील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल करता येणार आहे. मुंबईत 0 ते 2 वयोगटातील सर्वेक्षणात 20 हजार मुलांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेली नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर लस देण्याचे काम तातडीने पालिकेने हाती घेतलं आहे.
हे ही वाचा : तुम्ही कधी ग्रीन कॉफी प्यायलात? लोकांना वेड लावणाऱ्या या कॉफीचे फायदे वाचून थक्क व्हाल!
दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Disease symptoms, Health, Health Tips, Mumbai, Rare disease