बीड, 5 मे: बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) रणनीती संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) समन्वयक आणि मराठा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. कोविडमुळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
आरक्षण लढ्याच्या संदर्भात पुढची रणनीती आणि दिशा या बैठकीमध्ये ठरवली जाणार असून जिल्हा स्तरावरील या बैठकीनंतर राज्यभर बैठक घेणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले आहे. उद्या सकाळी 11 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं असून बैठकीला मराठा समाजातील सर्व संघटना आणि महत्वाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे.
'मराठा आरक्षणाचा कायदा कराच', मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच राजकीय नेत्यांच्याही यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुढील रणनिती ठरवण्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संभाजीराजे यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना पत्र
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यावर खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मिळून मार्ग काढावा, याव्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha kranti morcha, Maratha reservation, Vinayak mete