भंडारा, 8 जून: राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. त्याच दरम्यान राज्याच्या विविध भागांत वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy rain with strong winds) पडत आहे. विजांच्या कडकडाटही होत आहे. भंडाऱ्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू (3 died due to lighting strike) झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खमारी (बूज) गावात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात खमारी गावात शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. त्याचवेळी जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये अनिता फातू सवालाखे (45 वर्षे), आशा संपत दमाहे (46 वर्षे) आणि सहीक फीरतलाल उपराडे (48 वर्षे) यांचा समावेश आहे. तर रतीलाल उपराडे आणि पल्लवी रातीराम उपरडे हे जखमी झाले आहेत.
रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे 10 व 11 जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यु लावण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात 10 आणि 11 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 11 जूननंतर देखील पावसाचा धोका कायम असेल असे जिल्हाधिकारी नारायण मिश्रा म्हणाले.
तर तिकडे पश्चिम बंगालमध्येही विजांचा कडकडाट जोरदार झाला. जोरदार विजांच्या कडकडाट सुरू असताना वीज कोसळून तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील हुगलीत वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू, मुर्शिदाबाद जिल्ह्यात 9, बांकुरामध्ये दोन तर पूर्वी मिदनापुर आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhandara Gondiya, Rain