मुंबई 10 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. राज्यातील महत्त्वाची शहरं असलेल्या पुणे आणि मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुणे शहरामध्ये तर अधूनमधून वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. या दोन्ही शहरांमध्ये परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून साधारण एक आठवडा उशिराने जाणार आहे, असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (8 ऑक्टोबर) सांगितलं. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातून साधारण 8 ऑक्टोबर आणि पुणे शहरातून 9 ऑक्टोबरनंतर मान्सूनसचा परतीचा प्रवास सुरू होईल. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पुणे वेधशाळेतील वेदर फोरकास्टिंग विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एक्सटेंडेड रेंज फोरकास्टनुसार, उत्तर महाराष्ट्रातील भागातून (उत्तर मराठवाडा, वायव्य विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र) मान्सून लवकर माघार घेईल. साधारण 14 ते 20 ऑक्टोबरदरम्यान या ठिकाणी परतीचा पाऊस थांबेल.” Weather Rain Update : अखेर परतीच्या पावसाची तारीख ठरली, पण मुंबई, पुणेकर पावसात अडकणार कश्यपी म्हणाले की, पुढील काही दिवसांत केवळ महाराष्ट्राच्या काही भागांतच नव्हे तर राज्याच्या उत्तरेकडील प्रदेशातही मधूनमधून पाऊस पडेल. सतत पावसाची शक्यता आणि उपलब्ध आर्द्रतेमुळे देशाच्या काही भागांत मान्सूनचा मुक्काम लांबला आहे. “बंगालच्या उपसागरात मध्यवर्ती भागावर असलेल्या हवेच्या दाबामुळे 10 ते12 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत हवेच्या दाबाचा हा पट्टा पश्चिम किंवा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे. हा पट्टा दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि आसपासच्या भागातून पुढे जाऊ शकतो. या कालावधीत, महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असंही कश्यपी म्हणाले. Weather Update : पुढचे 3 दिवस धो-धो कोसळणार, महाराष्ट्रासह देशभरातील 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा पूर्व मध्य महाराष्ट्रावर असलेलं चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. या वादळातील कमी दाबाची एक रेषा गुजरातपासून पंजाबपर्यंत पसरली आहे. या स्थितीमुळे अद्याप मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि गुजरातच्या प्रमुख भागांतून मान्सूनने माघार घेतलेली नाही. सध्या 48 तासांत गुजरातच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, पूर्व राजस्थानच्या काही भागांत पुढील 72 तासांपर्यंत सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय, 12 ऑक्टोबरपर्यंत या प्रदेशांच्या आसपासच्या परिसरातही काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती कश्यपी यांनी दिली. 12 ऑक्टोबरनंतर, गुजरात, मध्य महाराष्ट्राचा अति उत्तरेकडील भाग, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात पाऊस हळूहळू कमी होऊ शकतो. एकूणच, देशात परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस आपल्याला पावसाचा सामना करावा लागू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.