मुंबई, 20 जानेवारी : नाशिकमध्ये सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांनी केलेल्या बंडामुळे काँग्रेस आणि महाविकासआघाडीवर मोठी नामुष्की ओढावली, यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आली. चर्चा नाशिकच्या निवडणुकीची असली तरी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मात्र तगडी फाईट होण्याचं चित्र आहे, कारण महाविकासआघाडीला खिंडीत गाठण्यासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं महाविकासआघाडीच्या बाळाराम पाटील यांना कडवं आव्हान असणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यात कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीकरता शिंदे - फडणवीस सरकारने जोर लावलाय. मुंबईतील पोट निवडणूकीनंतर आता विधान परीषद निवडणूकीकरता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, त्यात कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक चांगलीच गाजत आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोण असणार? याबाबत घडलेल्या सस्पेन्समुळे. या निवडणुकीत एकूण आठ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. मागच्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा निवडणूक रिंगणात दोन उमेदवार कमी आहेत. कोणत्याही पक्षाला अधिकृत उमेदवार न मिळाल्याने पक्षांनी आयाराम गयारामांच्या गळ्यात पक्षीय उमेदवारीची माळ घातली आहे. शेकापचे बाळाराम पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत, महाविकास आघाडीला उमेदवारच न मिळाल्याने त्यांनी आता बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. आधी ठाकरे गटाकडे असलेले कोकण शिक्षक मतदार संघाचे शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांना महाविकास आघाडीने डावल्याने बंड केलं. भाजपाने त्यांना आधीच गळाला लावले होते, त्यानंतर आता भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलंय. आश्चर्य म्हणजे ठाकरे शिक्षक संघटनेचा पाठिंबाही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनाच असल्याचे बोललं जातंय. गेल्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपा शिवसेना युती एकत्र लढली नव्हती. - बाळाराम पाटील ( आघाडीचे उमेदवार ) यांना 11 हजार 837 मते मिळाली होती - ज्ञानेश्वर म्हात्रे - शिवसेना पक्षाचे उमेदवार यांना 6 हजार 887 इतकी मते मिळाली होती ही त्यांची व्यक्तीगत मते होती, असं बोललं जातंय. - रामनाथ मोते - अपक्ष उमेदवार यांना 5 हजार 88 मते मिळाली होती - अशोक बेलसरे - भाजपा पक्षाचे उमेदवार 4 हजार 533 इतकी मते मिळाली होती. जर गेल्या निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केला तर रामनाथ मोते यांची शिक्षक संघटना, भाजपाचे अशोक बेलसरे यांची मते आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांची व्यक्तिगत मते एकत्रित केली, तर यंदाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पारडे जड दिसत आहे, कारण रामनाथ मोते आणि अशोक बेलसरे यांच्या शिक्षक संघटनांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. शिक्षकांचा आमदार शिक्षकच आसला पाहिजे, तेव्हाच त्याला शिक्षकाच्या अडचणी समजू शकतात. बाळाराम पाटील हे शिक्षक नाहीत, त्यामुळे आपणच जिंकणार असा दावा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केलाय. आघाडीचा धर्म म्हणून आपला उमेदवार नाकारून मागचे विजयी उमेदवार आणि शेकापचे नेते आणि आता आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. यात त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे पुत्र, त्यात मागची निवडणूक पाच हजारांच्या फरकाने जिंकल्याने त्यांनीही विजयाची खात्री व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बाळाराम पाटील यांना पुन्हा आमदार करण्यासाठी शेकाप सह ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा आपणच जिंकणार असल्याचा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही उमेदवारांचे दावे आणि प्रतिदावे आणि कोकण शिक्षक मतदार संघाची राजकीय परिस्थिती पाहता, आम्हीच निवडून येवू असा विश्वास दोन्ही उमेदवारांना आहे, पण कोणाला किती मते पडतील, कोणाची खेळी यशस्वी ठरेल हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.