मुंबई, 8 एप्रिल : राज्यात कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir injection) तुटवडा भासत असल्याचं समोर आलं आहे. रेमडिसिवीर इंजेक्शन आवश्यक असल्याने नागरिक नाईलाजाने मिळेल त्या किमतीत खरेदी करत आहेत. मात्र, या संकटाच्या काळात काहीजण कृत्रिम तुटवडा निर्माण करुन ब्लॅकमध्ये (remdesivir black marketing racket) चढ्या दराने औषध विक्री करत आहेत. अशाच प्रकारे रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
मुंबईत एकाला अटक, औषधांचा साठा जप्त
मुंबई क्राईम ब्रान्चच्या पथकाने मुंबईतील जोगेश्वरी भागात रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी 12 रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. या व्यक्तीचे आणखी काही सहकारी असल्याचा पोलिसांना संशय असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तसेच या आरोपीकडे आणखी इंजेक्शनचा साठा असल्याचा संशयही पोलिसांना आहे.
हे पण पाहा : Maharashtra Corona updates: राज्यातील कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी, 376 मृत्यू; पाहा कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण
नांदेडमध्येही रेमडिसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीला अटक
नांदेडमध्ये रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रेमडिसिवीर ब्लॅकमध्ये विकणाऱ्या चौघांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांकडून पोलिसांनी सात इंजेक्शनही जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.
मूळ किंमत कमी असतांना रेमडिसिवीर इंजेक्शन तब्बल आठ हजार रुपयांना विक्री केली जात होती. पोलीस पथकाने वीरभद्र स्वामी, बाबा पडोळे, बालाजी धोंडे आणि विश्वजित कांबळे या चौघांना ताब्यात घेतले. हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव आणि मनस्वी ऐजेसी संजीवनी हॉस्पिटल येथून हे चार आरोपी इंजेक्शन मिळवायचे आणि काळ्या बाजारात विक्री करायचे. या प्रकरणात गुन्हा दाखल करन्याची प्रक्रिया सुरू आहे. यात मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai police