Home /News /maharashtra /

महाराष्ट्रातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, 10 ते 12 जणांनी शस्त्रांसह केला हल्ला

महाराष्ट्रातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, 10 ते 12 जणांनी शस्त्रांसह केला हल्ला

घरी परतत असताना तंजोम्बातो येथे 10 ते 12 सशस्त्र व्यक्तींनी प्राणघातक हल्ला करून खून केला.

जळगाव, 17 जानेवारी : जळगावमधील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मूळ रहिवासी असलेले व अफ्रिकेतील जार्डिन मेबल या कंपनीचे मालक उद्योजक सर्वेश श्रीकांत मणियार यांचा खून करण्यात आला आहे. घरी परतत असताना तंजोम्बातो येथे 10 ते 12 सशस्त्र व्यक्तींनी प्राणघातक हल्ला करून खून केला. सहकाऱ्याने स्वत: ला मणियार यांच्या अंगावर झोकून देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळीच मणियार यांचा मृत्यू झाला असून त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अफ्रिकेतील वेळेनुसार गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मयत सर्वेश हे मूळचे धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी आहेत. 10 वर्षांपूर्वी सर्वेश हे अफ्रिकेतील एंटानानारिवो येथे स्थायिक झालेले आहेत. पत्नी खुशबू, 10 वर्षीय मुलगा श्रीरंग आणि मुलगी इशान्वी यांच्यासोबत राहत होते. तंजोम्बातो येथे जार्डिन मेबल या फर्निचर व प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे ते मालक आहेत. सर्वेश यांचा मृतदेह जोसेफ रावोआन्गी इंड्रियानालोना रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आय.व्ही. कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. फरार संशयिताना शोधण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली आहे . खून करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. वर्णभेदाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याबाबतही संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच व्यावसायिक स्पर्धेतून हा खून झाल्याचे देखील बोलले जात आहे. घटनास्थळी मणियार यांचा मोबाइलही आढळून आलेला नाही. चोरी झालेल्या वस्तूंबाबत पोलीस शोध घेत आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सर्वेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाऊ शैलेश, पत्नी व दोन मुलांच्या उपस्थितीत सर्वेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime news, Jalgaon

पुढील बातम्या