मुंबई, 18 जानेवारी : विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येतात की नाही, हे अद्यापही कुणी सांगू शकलेलं नाही. वर्षानुवर्षं राजकारण करत आलेले उमेदवार दरवेळी मतदारांना भुलवणारे जाहीरनामे देतात आणि त्याचं पुढे काय होतं कळत नाही, अशी परिस्थिती गावपातळीपासून देश पातळीवरच्या राजकारणाची आहे. ग्रामंपचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही परिस्थिती बदलू शकते अशी आशा निर्माण करणारी काही उदाहरण निश्चित दिसली. त्यासाठीच ऋतुराज देशमुख या 21 वर्षांच्या उच्चशिक्षित उमेदवाराची चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावची निवडणूक ऋतुराज रवींद्र देशमुख या फक्त 21 वर्षांच्या तरुणाने जिंकली. अगदी तालुक्यापर्यंत मला हरवण्यासाठी प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो, अशी प्रतिक्रिया ऋतुराजने जिंकल्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे. या उमेदवाराचा संघर्ष सुरू झाला होता, त्याच्या विकासाभिमुख जाहीरनाम्याने
घाटणे गावची निवडणूक तशी फार महत्त्वाची ठरण्याचं कारण नव्हतं, पण ऋतुराजने त्याकडे लक्ष वेधलं. ग्रामीण भागात उच्चशिक्षणासाठी शहरात गेलेली मुलं फारशी गावाकडे फिरकत नाहीत. ऋतुराज याला अपवाद ठरले. त्यांनी BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि पुण्यात LLB साठी प्रवेश घेण्यास ते उत्सुक आहेत. पण 20-21 व्या वर्षीच त्यांनी गावच्या राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. "आम्हा तरुणांना राजकारणापेक्षा गावच्या विकासात जास्त इंटरेस्ट आहे. जुन्या मंडळींना खुर्ची धरून ठेवण्यात रस जास्त आहे. आमचं तसं नाही", ऋतुराज सांगतात.
त्यांनी 2021 च्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचं पॅनेल उभं केलं. त्यांच्या पॅनेलचे 7 पैकी 5 उमेदवार निवडून आले आहेत. निवडून आल्यावर काय करणार याचा जाहीरनामा ऋतुराज देशमुख यांनी कागदावर दिला होता. त्यात गावच्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजनांची माहिती होती. संपूर्ण राज्यातलं पहिलं सोलर गाव अशी ओळख घाटणे गावाला मिळावी यासाठीचा प्लॅनसुद्धा ऋतुराज यांनी आधीच दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat