जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhagatsinh Koshyari : राज्यपाल कोश्यारींची राजीनाम्याची तयारी, पण महाविकासआघाडीने सांगितली 'अंदर की बात'!

Bhagatsinh Koshyari : राज्यपाल कोश्यारींची राजीनाम्याची तयारी, पण महाविकासआघाडीने सांगितली 'अंदर की बात'!

Bhagatsinh Koshyari : राज्यपाल कोश्यारींची राजीनाम्याची तयारी, पण महाविकासआघाडीने सांगितली 'अंदर की बात'!

Maharashtra Governor Bhagatsinh Koshyari to resign महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली आहे. पण याबाबत महाविकासआघाडीच्या नेत्यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 जानेवारी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, असं राज्यपालांनी सांगितल्याचं प्रसिद्धीपत्रक राजभवनाकडून देण्यात आलं आहे. महाविकासआघाडीची प्रतिक्रिया भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या इच्छेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान राज्यपालांनी दर्शवलेल्या राजीनाम्याच्या इच्छेवर महाविकासआघाडीने प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी अनेकदा आमच्यासमोर महाराष्ट्र सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र केंद्र सरकार त्यांना सोडत नाही. कदाचित महाराष्ट्रासाठी राज्यपाल पदासाठी केंद्र सरकारला योग्य उमेदवार मिळत नसतील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. बरेच दिवसांपूर्वी आपण राज्यपालांना भेटायला गेलो होतो, तेव्हाही त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. आता त्यांना इच्छा व्यक्त करण्याचा वरून आदेश आला असेल, म्हणून त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असेल, असा दावाही खैरे यांनी केला आहे. ‘राज्यापालांनी दिलेलं हे पत्र मीडियासमोर लिक केलं असेल तर यापूर्वीच त्यांनी खासगीमध्ये महाराष्ट्रातून मला दुसरीकडे पाठवा. मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशाप्रकारची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली असावी,’ असं शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याबाबत शंका व्यक्त केली होती. भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्र सोडून जायचं आहे, त्यामुळेच ते वादग्रस्त वक्तव्य करत नाहीत ना? असा संशय अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

News18लोकमत
News18लोकमत

राज्यपाल वादात राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यापासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत संघर्ष पाहायला मिळाला. मागच्या काही दिवसांमध्ये महापुरुषांबाबत केलेल्या विधानांमुळे कोश्यारी वादात अडकले होते. या विधानांमुळे विरोधकांनी राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनंही केली आणि राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात