जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यपाल कोश्यारींचं महाराष्ट्रातून 'टेकऑफ', स्पेशल विमानाने उत्तराखंडला रवाना, Video

राज्यपाल कोश्यारींचं महाराष्ट्रातून 'टेकऑफ', स्पेशल विमानाने उत्तराखंडला रवाना, Video

राज्यपाल कोश्यारींचं महाराष्ट्रातून 'टेकऑफ', स्पेशल विमानाने उत्तराखंडला रवाना, Video

महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. भगतसिंग कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. भगतसिंग कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचं मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनला प्रस्थान झालं. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांसमोर राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती, यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला. भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रमेश बैस हे 18 जानेवारी म्हणजेच उद्या राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत.

जाहिरात

भगतसिंग कोश्यारी वादात भगतसिंग कोश्यारी 2019 साली महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले, पण त्यांची कारकिर्द वादात राहिली. महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी विरोधी पक्षांनी कोश्यारींविरोधात आंदोलनं केली, तसंच त्यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली. शिंदे गट आणि भाजपनेही कोश्यारींच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना राज्यात राजकीय संघर्षही मोठ्या प्रमाणावर झाला. 2019 साली भाजप-शिवसेना युतीला बहूमत मिळूनही दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, पण मध्येच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना राज्यपालांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. फडणवीस आणि अजित पवार यांचं हे सरकार तीन दिवसांमध्ये कोसळलं, यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे हे सरकार अडीच वर्षात कोसळलं आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. राज्यातल्या या सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिकाही महत्त्वाची ठरली, याच भूमिकेला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं आहे, ज्याचा खटला सुरू आहे. भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना 4 वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. तसंच कोश्यारी आणि महाविकासआघाडी यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचला होता. कोरोना काळात कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धर्मस्थळ सुरू करण्याबाबत वादग्रस्त पत्र लिहिलं आणि हिंदुत्व विसरलात का? असा सवाल कोश्यारी यांनी या पत्रात विचारला होता. तसंच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरही कोश्यारी यांनी सही केली नाही, त्यामुळे 12 आमदारांचा प्रश्न प्रलंबित राहिला, यावरूनही महाविकासआघाडीने राज्यपाल कोश्यारींवर वारंवार टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात