मुंबई,15 जुलै: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह प्रकरणी आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोला (Anti Corruption Bureau) परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे घेणे आणि पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी पथकानं यासंबंधित तपास सुरु केला आहे. या तपासादरम्यान एसीबी तपासाशी संबंधित लोकांची जबाब आणि कागदपत्रे तपासासाठी मागवण्याची शक्यता आहे. 19 मे रोजी तपास सुरू झाला असून या महिन्याच्या शेवटी हा अहवाल एसीबी सरकारला सादर करेल.
हेही वाचा- Breaking News: दहावीच्या निकालासंदर्भात शिक्षण मंत्रालयानं दिली मोठी माहिती
दरम्यान परमबीर सिंह यांनी आपली आजरपणाची रजा (Sick Leave) वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध करत असलेल्या चौकशीला विलंब होत आहे. पाठीचा आजार बळावल्याचं कारण देत त्यांनी ही रजा वाढवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एप्रिल 30 पासून ते रजेवर आहेत.
ईडीच्या रडारवरही परमबीरसिंह
परबीर सिंह सुद्धा ईडीच्या (ed) रडारवर आले असून लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी लवकर परमबीर सिंग यांना चौकशीला बोलावून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना त्याबद्दल समन्स सुद्धा बजावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.