परळी, 24 ऑक्टोबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. यात सगळ्यात महत्त्वाच्या अशा परळी विधानसभा मतदारसंघातून निकाल हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हाती लागलेल्या निकालानुसार पंकजा मुंडे या आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, बाजी मारत आता धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे परळीतून नेमका कोणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. यामध्ये परळीतून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचा Exit Poll News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असा Exit Poll चा निकाल सांगण्यात आला होता. या पोलनुसार, पंकजा मुंडे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परळी मतदारसंघ सगळ्यात जास्त गाजला तो मुंडे भाऊ-बहिणींमध्ये. दोघांमध्येही कठोर टक्कर पाहायला मिळते. पण अशात धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. यावेळी पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि आमदार झाल्या. इतर बातम्या - Result 2019 LIVE: राज्याचा पहिला कल हाती; युतीला 3 जागांवर आघाडी या निवडणुकीत पंकजा मुंडेंना आमदारकीचं तिकीट मिळाल्यामुळे नाराज झालेल्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धनंजय मुंडे विधान परिषदेत आमदार झाले. परळी मतदारसंघ पूर्वी रेणापूर म्हणून ओळखला जायचा. या मतदारसंघात एखादा अपवाद वगळला तर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पूर्वीच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे 5 वेळा आमदार झाले. 1985 ला मात्र पंडितराव दौंड यांनी गोपीनाथ मुंडेंचा पराभव केला. 2009 मध्ये पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. त्यानंतर 2 वेळा इथून पंकजा मुंडे आमदार झाल्या. परळीमध्ये कोणतीही निवडणूक असली तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना पाहायला मिळतो. 2016 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या गटाने बाजी मारली. पंकजा मुंडे मंत्री असतानाही परळी नगरपालिकेत सत्ता आणू शकल्या नाहीत याची त्यावेळी खूपच चर्चा झाली. यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हाच संघर्ष पाहायला मिळाला. मात्र भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात 19 हजारांचं मताधिक्य मिळालं. पंकजा मुंडे या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री असल्याने परळीमध्ये त्यांचा दबदबा आहे. परळी विधानसभा मतदारसंघातल्या विकासकामांसाठी त्यांनी भरीव निधी आणला. त्यांचं हे काम आता त्यांना इथे पुन्हा एकदा विजय मिळवून देईल का ते पाहावं लागेल. 2014 विधानसभा निवडणुकीतली मतं पंकजा मुंडे, भाजप - 96 हजार 904 धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस - 71 हजार 009 प्रा. टी. पी. मुंडे, काँग्रेस - 14 हजार 946
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







