राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 17 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (Delta Plus Variant of Coronavirus in Maharashtra) रुग्ण वाढत आहेत. आता या रुग्ण संख्येत 10 ने वाढ झाली असून डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या 76 वर पोहचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. मात्र राज्य सरकार आणि आरोग्य विभाग ICMR ने दिलेल्या प्रोटोकॉल नुसार सर्व काळजी घेत असून सर्व डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या कोरोना रुग्णांना आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या डेल्टा व्हेरिएंटची बाधा झालेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच सुद्धा अलगीकरण करण्यात येत आहे त्यामुळे मात्र घाबरण्याचे कारण नाही असं आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. सोमवारी (16 ऑगस्ट 2021) इन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अॅड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेने राज्यात आणखी 10 डेल्टा प्लस रुग्णांचे निदान केले आहे. यापैकी 6 रुग्ण हे कोल्हापूर जिल्ह्यातील, 3 रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील तर एक रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. हे दहाही रुग्ण कोविड 19 आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील कुठल्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचे किती रुग्ण? जळगाव - 13 रत्नागिरी - 15 मुंबई - 11 कोल्हापूर - 7 ठाणे, पुणे - प्रत्येकी 6 पालघर, रायगड - प्रत्येकी 3 नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग - प्रत्येकी 2 चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड - प्रत्येकी एक रुग्ण आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 76 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 37 रुग्ण पुरुष असून 39 स्त्रिया आहेत. या 76 रुग्णांपैकी 10 जणांचे दोन्हीही कोविड लस डोस झालेले आहेत तर 12 जणांनी केवळ 1 डोस घेतलेला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी दोन व्यक्तींनी कोवॅक्सिन तर इतरांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे. ‘सैन्य वापसीचा निर्णय योग्यच; देशाला गरज असताना घनींनी अफगाणिस्तानातून पळ काढला’, बायडन यांची प्रतिक्रिया ब्रेक द चेन अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना राज्यातील 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने सुधारणा केली आहे. राज्यात 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देतांना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.