महाराष्ट्रात पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या लक्षात घेत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवला जातो आहे. पण अनलॉकच्या या टप्प्यात 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 0.15 इतका कमी झाला आहे. मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे, असं आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.
यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवड्यातील आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोलीचा समावेश आहे.
या 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. या ठिकाणी चाचणी, ट्रेसिंग आणि लसीकरणावर भर दिला जाईल, असं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितलं.
या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत, असं कोविड टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितलं.
जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा. जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.