मुंबई, 19 सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन ठराव मंजूर करण्यात आले. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, तसंच प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना देण्यात यावा, हे ते दोन ठराव होते. काँग्रेसच्या बैठकीत हे ठराव मंजूर करण्यात आले असले तरी चर्चा मात्र बैठकीला गैरहजर राहिलेल्या नेत्यांचीच होत आहे. काँग्रेसच्या आजच्या बैठकीला सुशील कुमार शिंदे, अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, सतेज पाटील, केसी पाडवी, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे, विक्रम सावंत, रणजित कांबळे अनुपस्थित होते. दरम्यान नेत्यांच्या गैरहजेरीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नागपूरहून येणारं विमान रद्द झालं. अमित देशमुख परदेशात आहेत, तर संग्राम थोपटे यांची तब्येत खराब आहे. सुशील कुमार शिंदे यांनी कळवलं होतं, असं नाना पटोले म्हणाले. विश्वासदर्शक ठरावालाही दांडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे 11 आमदार विधिमंडळात उशीरा पोहोचले, त्यामुळे त्यांना मतदानामध्ये सहभागी होता आलं नाही. काँग्रेसच्या या आमदारांमध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, झिशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबर्डे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरिष चौधरी यांचा समावेश होता. विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानाला उपस्थित न राहिल्यामुळे काँग्रेसने या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.