राज्यातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवण्याते संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
होळी आणि रंगपंचमीनंतर कोरोना प्रकरणं जास्त वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने तयारी सुरू केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची योजना आखण्याचे आदेश दिलेले आहेत.
एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा, मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.
गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा. प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.
विशेषत: वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.