ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 31 मार्च: जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत पालकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. मात्र, काही जिल्हा परिषदेच्या शाळांतील उपक्रमांमुळे या शाळा विद्यार्थीप्रिय ठरत आहेत. अशीच एक शाळा लातूर जिल्ह्यात असून तेथील शिक्षिकेचा अनोखा 'लातूर पॅटर्न' चर्चेचा विषय ठरत आहे. चांडेश्वर येथील शाळेच्या शिक्षिका वर्षा आगलावे या विद्यार्थ्यांसोबत माता पालकांनाही विविध उपक्रमात सहभागी करून घेतात.
शालेय उपक्रमात मातांचा सहभाग
चांडेश्वरी येथील जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची निर्माण व्हावी यासाठी मातांनाही उपक्रमांत सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे शाळा, विद्यार्थी आणि माता पालक यांचे एक वेगळे बाँडिंग तयार झाले आहे. माता घरातही मुलांचा अभ्यास घेतात त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासही या उपक्रमाचा लाभ होत आहे.
पटसंख्या वाढण्यास मदत
जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका वर्षा आगलावे या विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम घेतात. त्यामुळे शाळेची गुणवत्ता उंचावत आहे. त्यामुळे शिक्षिकांचा जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनेक पालक इंग्लिश माध्यमातील शाळेत शिकणाऱ्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवत आहेत. शिक्षकांवर विश्वास बसल्याने त्याचा फायदा शाळेतील पट वाढण्यासही झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रेरणा
शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना मिळत आहे. त्यातच आईचा शिक्षण प्रक्रियेत सहभाग असल्याने मुलांच्या प्रगतीतील अडथळे पालकांपर्यंत पोहोचत आहेत. शिक्षिका चांगल्या पद्धतीने मुलांचे कच्चे दुवे आणि त्यांच्यातील विशेष प्राविण्य याबाबत पालकांना माहिती देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना विकसित करण्याची संधी निर्माण होते. मुलांना शिक्षणासोबत कला, क्रीडा आदी शिक्षण देण्यास पालकांचा पाठिंबा मिळतो.
Nashik News : शालेय विद्यार्थ्यांचं जबरदस्त संशोधन, अंधांसाठी बनवली Blind Stick, पाहा Video
शाळेत राबवण्यात येतात विविध उपक्रम
चांडेश्वरी जिल्हा परिषद शाळेत सखी सहेली उपक्रम राबविला जातो. तसेच पंढरीची वारी शाळा प्रवेशोत्सव, एक दिवस गावासाठी श्रमसंस्कार शिबीर, कष्टाची भाकरी, आनंदनगरी, प्रेमाचा घास, बिनभिंतीची शाळा असे उपक्रम राबविले जातात. मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न होतो. बिन भिंतीची शाळा उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग, शेतीचे धडे दिले जातात. शाळेतील विविध उपक्रमांमुळे मुलांमध्ये अमुलाग्र बदल दिसून येत आहेत. मातांनाही नवीन टेक्नॉलॉजीची माहिती मिळत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना शिक्षणात होत आहे, असे माता पालकांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Latur, Local18, School teacher