ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 15 मार्च: अवयवदान सर्वश्रेष्ठदान मानले जाते. त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवन मिळत असते. परंतु, याच अवयवादानाबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात आणि मृत्यूनंतर अवयवदान करणे टाळले जाते. परंतु, लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर) या गावाने जगासमोर वेगळा आदर्श घातला आहे. येथील महिला कारभारनींनी गावात मरणोत्तर अवयवदानाच संकल्प केला आहे. विशेष म्हणजे मरणोत्तर अवयवदान करणारे आनंदवाडी (गौर) हे भारताली पहिले गाव ठरले आहे. सामाजिक परिवर्तनात अग्रेसर गाव आनंदवाडी हे गाव लातूर जिल्ह्यात सामाजिक परिवर्तनात अग्रेसर असणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये सर्व कारभार महिलाच पाहतात. सरपंच ते ग्रामपंचायत सदस्य महिलाच आहेत. गावाने हुंडाबंदी लागू केलेली असून गावातील सर्व घरे ही महिलांच्या नावे करण्यात आलेली आहेत. या गावामध्ये 650 लोकसंख्या असून 112 कुटुंब गुण्यागोविंदाने नांदतात. शासनाच्या कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता सरपंच व इतर प्रमुख व्यक्ती यांच्या संकल्पनेतून केवळ गाव विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात
अवयवदानाचा संकल्प गावातील सर्वांनीच मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. आतापर्यंत या गावातील बारा जणांचे मरणोत्तर अवयव दान झाले आहे. उर्वरित सर्व गावातील लोकांनी मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केला आहे. असा संकल्प करणारे आनंदवाडी हे देशातील पहिले गाव ठरले आहे. विविध योजनांसाठी ओळख आनंदवाडीत विविध योजना लागू आहेत. गावात रक्षाबंधन सामूहिक रित्या साजरा केला जातो. त्यादिवशी महिलांच्या आरोग्यासाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात येते. गावातील स्मशानभूमी ही अशा प्रकारे सुशोभित करण्यात आली आहे की जसे आपण एखाद्या उद्यानात जातो असा अनुभव स्मशानभूमी मध्ये गेल्यानंतर येतो. यामध्ये रक्षा विसर्जनाचीही वेगळी पद्धत या गावात असून रक्षा विसर्जनाच्या वेळी ती नदीत ओढ्यात न टाकता ती त्या कुटुंबाच्या शेतात नेऊन मृत व्यक्तीच्या नावे झाडे लावली जातात. मृत व्यक्तीची स्मृती म्हणून त्या झाडाचे संगोपन केले जाते. लातूरमधील ‘या’ गावात महिलाराज; स्त्रियांच्या हाती आहे संपूर्ण कारभार, Video गटारींवर लावली फुलझाडे गावातील उघडी गटारे ही स्वच्छतेला बाधक असतात. त्यासाठी गावातील सर्व गटारी बंदिस्त करून त्यावरती फुल झाडे, तुळशीची रोपे लावण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना होणारा आरोग्याचा धोका टाळता यावा ही आमची संकल्पना असल्याचे ज्ञानोबा चामे यांनी सांगितले. विविध पुरस्कारांनी सन्मान निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर या गावाला विविध पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता आमिर खान यांची वॉटर कप स्पर्धेदरम्यान या गावाला भेट दिली होती. तेव्हा “भारत मे ऐसा भी गाव होगा, मैने सोचा नहीं था,” या शब्दात गावकऱ्यांचे कौतुक केले गेले.