ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 18 मार्च: भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी म्हणी, वाक्प्रचारांचा योग्य ठिकाणी वापर आवश्यक असतो. चारचौघात बोलताना भाषा अलंकाराचा वापर केला तर भाषा चातुर्य व भाषेची लवचिकता आत्मसात होते. म्हणी पाठांतराचे रटाळ काम शाळेतील मुलांना आवडत नाही. मात्र लातूरमधील रायवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुले म्हणी आणि वाक्प्रचार रोजच्या बोलण्यात सहज वापरत आहेत. शाळेतील शिक्षिका मंगल डोंगरे यांनी त्यासाठी भन्नाट कल्पना वापरली आहे.
म्हणी, वाक्प्रचार भाषेचे सौंदर्य
भाषा विषय म्हणलं की त्याच्या अभ्यासासाठी म्हणी, वाक्यप्रचार विद्यार्थ्यांना पाठ करणे अवघड वाटते. पण लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांनी एक वेगळाच प्रयोग केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणी वाक्यप्रचार लक्षात ठेवणे सोपे झाले आहे. मराठी भाषेमध्ये दररोजच्या बोलण्यात लिखाणात म्हणींचा वापर सर्रास केला जातो. विद्यार्थ्यांची भाषा विषयावरील प्रभुत्व मिळवायचे असेल तर शब्द संपदा असणे गरजेचे असते.
म्हणी, वाक्प्रचारांचा वापर
मानवाची चित्र स्मृती ही सर्वात जास्त असते. यामुळे ते कधीही विसरत नाही, त्यासाठी चित्रातून शिक्षण देण्याचा प्रयोग शिक्षिका डोंगरे यांनी केला. वाक्प्रचार व म्हणी लक्षात ठेवण्यासाठी चित्राचा वापर करून त्या म्हणी पूर्ण करून आणण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. यामधून विद्यार्थ्यांना म्हणी व म्हणींचा अर्थ, त्याचा वाक्यात उपयोग करणे, या सर्व गोष्टी अवगत झाल्या.
मनपा शाळेत विद्यार्थ्यांना QR कोडंनं शिक्षण, पाहा का लढवली शिक्षकानं शक्कल, Photos
म्हणी, वाक्प्रचार लक्षात राहण्यासाठी विशेष उपक्रम
विद्यार्थ्यांना म्हणी आणि वाक्प्रचार लक्षात राहावेत म्हणून शाळेत विशेष उपक्रम घेतला. सर्वप्रथम मुलांना मिळेल तसे चित्र जमवण्यास सांगितले. मुलांनी शोधाशोध सुरु केली. वर्तमानपत्रे, जुनी फाटलेली मासिके, पाठ्यपुस्तक इतकेच काय तर कचऱ्यातूनही चित्रे जमवण्याचा छंद लागला. त्यानंतर पाठ्यपुस्तकातील म्हणी व वाक्प्रचार मुलांनी शोधून संग्रह केला. स्वतःला समजलेला अर्थ मुलांनी लिहिला. शिक्षकांकडून तपासून घेतला. जनरल पेपरवरती (प्रोजेक्ट पेपर) मुलांनी रंगीत अक्षरात म्हण व वाक्प्रचार ठळक अक्षरात लिहिली. त्यांचा अर्थ लिहून त्या म्हणी व वाक्प्रचारांशी सुसंगत चित्रे चिकटवली. अशा शंभराहून अधिक चित्रमय म्हणी तयार झाल्या.
विद्यार्थ्यांसाठी खास गृहपाठ
आपण दररोजच्या बोलण्यात अनेक म्हणींचा वापर करत असतो. पण त्यांचा नेमका अर्थ काय? या म्हणी कशासाठी वापरल्या जातात? या सर्व गोष्टी लक्षात याव्या यासाठी डोंगरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आजी, आई-वडील आजोबा शेजारी व इतरत्र फिरताना ज्या म्हणी मिळतील त्या एका वहीमध्ये संग्रहित करायला लावल्या. यामुळे विद्यार्थ्यांकडे म्हणींचा साठा जमा झाला. तसेच वाक्यप्रचाराच्या बाबतीत वाक्यप्रचार हे वाक्यात बसवून त्याचा अर्थ व त्यावर उतारा लिहिणे याची प्रॅक्टिस शाळेमध्ये करून घेतली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये लिखाणाची सवय वाचनाची आवड निर्माण झाली.
लॉकडाऊनचे दुष्परिणाम अजूनही, तुमच्या मुला मुलींनाही ही लक्षणे आहेत का?
शिष्यवृत्ती परीक्षेत फायदा
या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये जास्त मार्क मिळवता आले. कारण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे म्हणी व वाक्यप्रचार यावरती आधारित असतात. आता विद्यार्थी शाळेत, घरी बोलताना म्हणींचा वापर अगदी सहजपणे करू लागले आहेत. इयत्ता सातवी व आठवी च्या विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये अधिक रुची निर्माण झाली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांनी म्हणींचा संग्रह इतक्या मोठ्या प्रमाणात गोळा केला आहे की त्याचे पुस्तक बनवू शकते असे डोंगरे मॅडम म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Innovation, Latur, Local18, School teacher